मडगाव रवींद्र भवनात प्रथमच सवेष नांदी गायन, नाट्य प्रवेश स्पर्धा

कुठल्याही हौशी संस्थेला या स्पर्धेत भाग घेता येणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th September, 11:55 pm
मडगाव रवींद्र भवनात प्रथमच सवेष नांदी गायन, नाट्य प्रवेश स्पर्धा

मडगाव : रवींद्र भवन मडगावतर्फे विविध कलांना उत्तेजन देण्याच्या उद्देशाने विविध कार्यशाळा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात खास करून गोमंतकीय कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या कलेला उत्तेजन दिले जाते. यंदा रंगभूमी दिनानिमित्त रवींद्र भवन मडगाव तर्फे सवेष नांदी गायन व नाट्य प्रवेश स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

५ नोव्हेंबर हा रंगभूमीवर काम करणार्‍या प्रत्येक कलाकारासाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. कै. चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात कै. विष्णुदास भावे यांनी ५ नोव्हेंबर १८४३ साली “सीता स्वयंवर” या नाटकाचा पहिला प्रयोग रंगमंचावर सादर केला. याच नाटकाच्या प्रयोगाने संगीत नाटकांच्या प्रवासाला सुरूवात झाली.

कुठल्याही नाटकाची सुरुवात नटराजाच्या स्तुतीने होत असते. ज्याला नांदी, मंगलचारण किंवा सूचकपद असे म्हणतात. लुप्त होत जात असलेल्या नांदी गायन कलेचा प्रचार आणि प्रसार चालू रहावा म्हणून यावर्षी गोवा मर्यादित नांदी गायन स्पर्धा रवींद्र भवन मडगावतर्फे आयोजित करण्यात आली आहे. गोव्यातील कुठल्याही हौशी संस्थेला या स्पर्धेत भाग घेता येणार असून जास्तीत जास्त दहा प्रवेशिका स्वीकारल्या जातील. तसेच प्रथम येणाऱ्या संस्थांना प्राधान्य दिले जाईल.

प्रत्येक संस्थेला नांदी गायनानंतर लगेच एक नाट्य प्रवेश सादर करावा लागेल. नांदी गायनासाठी कमीत कमी ६ मिनिटे व जास्तीत जास्त ८ मिनिटे तर नाट्य प्रवेशासाठी ७ मिनिटांचा अवधी ठरविला आहे. या स्पर्धेत सवेष नांदी गायन व नाट्य प्रवेश असे दोन्ही मिळून सादरीकरणाला बक्षिसे दिली जाणार आहेत.

सवेष नांदी गायन आणि नाट्य प्रवेशासाठी ३५०००, ३०००० व २५००० रुपये अशी प्रथम तीन बक्षीसे आहेत. तर उत्कृष्ट अभिनयासाठी ७०००, ५००० व ३००० रोख अशी बक्षीसे आहेत. या शिवाय उत्कृष्ट हार्मोनियम व तबला वादनासाठी व उत्कृष्ट वेशभूषेसाठी ५००० रुपयांचे खास बक्षीस दिले जाईल. इच्छुक संस्थानी रवींद्र भवन मडगाव येथे आपले अर्ज ४ ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन रवीद्र भवन मडगावतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८७८८४४९१६७ या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.