खून प्रकरणातील संशयिताला भावाच्या लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी

इस्माईलला प्रवासाला निर्बंध

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
खून प्रकरणातील संशयिताला भावाच्या लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी

मडगाव : दवर्ली भगवती येथे २०२० मध्ये मुजाहिद खान याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित इस्माईल मुल्ला ऊर्फ छोटू याला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांचा जामीन अटीशर्तीवर देण्यात आलेला आहे. संशयिताला लग्नसमारंभ स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणी जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

भगवती कॉलनी दवर्ली येथे २०२० मध्ये मुजाहिद खान याचा चाकू भोसकून खून करण्यात आलेला होता. या खूनप्रकरणात सादिक बेल्लारी व इस्माइल मुल्ला उर्फ छोटू या दोघांना अटक करण्यात आलेली होती. गेल्यावर्षी जूनमध्ये या प्रकरणातील संशयित सादिक बेल्लारी याला जामीन मिळालेला होता.

मुजाहिद याचा खून झाला त्याचवेळी त्याचा भाऊ कादर खान व कादरचा मित्र तौसिफ यांनी खुनातील दोन्ही संशयितांना संपवण्याचे निश्चित केले होते. त्यानंतरही फोनवरून एकमेकांना मारण्याच्या धमक्या सादिक व कादर या दोघांकडून एकमेकांना देण्यात येत होत्या. रेकी करुन जामिनावर सुटलेल्या सादिकची दिनचर्या जाणून घेत सादिक झोपेत असताना त्याचा खून करण्यात आला होता.

सादिकच्या खुनासाठी मुजाहिदच्या भावाने कादर खानने वापरलेला कोयता केवळ भावाच्या खुनाचा बदला म्हणून त्याच्या मारेकऱ्यांना मारण्यासाठी २०२० मध्ये खरेदी केला असल्याचे या प्रकरणात पुढे आले होते.

याच कारणास्तव मुजाहिद खान खून प्रकरणातील दुसरा संशयित इस्माईल मुल्ला याला यापूर्वी एकदा जामीन नाकारण्यात आला होता.

आता दक्षिण गोवा जिल्हा न्यायाधीश शेरीन पॉल यांच्या न्यायालयातील सुनावणीवेळी अटीशर्तीवर संशयित इस्माईल याला २५ सप्टेंबरपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला असून २६ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत त्याने कोलवाळ तुरुंगात येण्याची अट घातलेली आहे.

२५ हजारांचा वैयक्तिक जातमुचलका तसेच तेवढ्याच किमतीचा हमीदार सादर करावा, कोणत्याही साक्षीदाराला धमकावू नये, भावाचे लग्न असलेल्या ठिकाणीच उपस्थित राहता येणार अशा अटींवर संशयित इस्माईलला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. त्याव्यतिरिक्त इस्माईलला प्रवासाला निर्बंध घालण्यात आले आहे.

यापूर्वी ईस्माईलच्या जामिनाला विरोध:
सरकारी वकिलांकडून संशयित इस्माईल याने यापूर्वी जामिनावर असताना एकास धमकी दिली होती व त्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांत गुन्हा नोंद आहे. तसेच मुजाहिद खान प्रकरणातील सादिक बेल्लारीचा खून झालेला असून ईस्माईलच्या जीवाला धोका असू शकतो असे सांगत जामिनाला विरोध दर्शवला होता.