उल्लंघन केल्यास भुतानी​चे परवाने रद्द करा

मुख्यमंत्र्यांचे टीसीपी मंत्री विश्वजीत राणेंना निर्देश यापुढे मेगा प्रकल्पांचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
उल्लंघन केल्यास भुतानी​चे परवाने रद्द करा

पणजी : डोंगर कापणी आणि झाडांच्या कत्तलीवरून वादात सापडलेल्या भुतानी इन्फ्रा प्रकल्पाचे परवाने तपासण्याचे तसेच नियमांचे पालन न केल्यास परवाने रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांना दिले. 

दरम्यान यापुढे नगर नियोजन खात्याच्या (टीसीपी) सुकाणू समितीने मेगा प्रकल्पांचे सर्व प्रस्ताव आपल्यासमोर सादर करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी नगरनियोजन मंत्र्यांना केल्या.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर लगेच नगर नियोजन खाते आणि मुरगाव पीडीएने भुतानी इन्फ्राच्या नावे सुरू असलेल्या परमेश कन्स्ट्रक्शन कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. तुमचा विकास परवाना रद्द का करू नये अशी विचारणा करून सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. यामुळे आता सांकवाळ येथील नियोजित भुतानी प्रकल्प संकटात सापडला आहे.


गेल्या काही दिवसांपासून भुतानी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केल्यामुळे राज्यात खळबळ उडाली असून, राजकीय पक्षांकडून सनद आणि परवान्यांवरून आरोप होत असतानाच मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचे दस्तावेज तपासण्याचे आदेश दिले. 

भाजप कार्यकारिणीची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत भुतानी प्रकल्पावर चर्चा झाली. भाजपच्या कोअर समितीनेही या प्रकल्पाविषयी सरकारने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी नगरनियोजन मंत्र्यांशी चर्चा करून प्रकल्पाचे दस्तावेज तपासण्याचे निर्देश दिले. दरम्यान भविष्यात असा गोंधळ टाळण्यासाठी यापुढे मेगा प्रकल्पाचे प्रस्ताव आपल्यासमोर आणावेत असेही मुख्यमंत्र्यांनी टीसीपीला सांगितले.

मुरगाव पीडीएची भुतानीला कारणे दाखवा

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुरगाव पीडीएने भुतानी इन्फ्राच्या नावे सुरू असलेल्या परमेश कन्स्ट्रक्शन कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विकास परवाना रद्द का करू नये अशी विचारणा केली आहे. सात दिवसांत उत्तर देण्याची मुदत या नोटीशीत देण्यात आली आहे.