किनारी बांधकाम आराखड्यातील बदलांसाठी १० टक्के अतिरिक्त शुल्क

‘बीच वेडिंग’ला मोजावे लागणार दिवसाला १लाख रुपये

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
किनारी बांधकाम आराखड्यातील बदलांसाठी १० टक्के अतिरिक्त शुल्क

पणजी : किनारी भागांतील घरे तसेच इतर बांधकामांसाठीचा आराखडा बदलायचा असेल, तर आता मूळ शुल्काच्या १० टक्के अतिरिक्त रक्कम भरावी लागणार आहे. शुल्क बदलण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच, ‘बीच वेडिंग’साठी आता दररोज एक लाख रुपये शुल्क भरावे लागणार आहे. याआधी संपूर्ण सोहळ्यासाठी एक लाख रुपये शुल्क आकारण्यात येत होते.

घराचे बांधकाम, दुरुस्ती आणि शॅक्स उभारणीसाठी आगाऊ शुल्क आकारले जातात. मात्र, आता त्या शुल्काच्या १० टक्के रक्कम आराखडा बदलण्यासाठी भरावी लागणार आहे. घरांच्या दुरुस्ती किंवा नूतनीकरणासाठी २५,००० रुपये शुल्क आहे.

यापूर्वी किनाऱ्यावर लग्न समारंभ किंवा इतर समारंभांसाठी एकूण एक लाख रुपये शुल्क आकारले जात होते. आता यासाठी दररोज एक लाख रुपये द्यावे लागतील. आराखडा बदलण्यासाठी १० टक्के किंवा १०,००० रुपये प्रतिदिन शुल्क आकारले जातील. शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था आणि सरकारी महामंडळे यांना शुल्कात ७५ टक्के सूट मिळणार आहे. खुल्या सभामंडपासाठी ५ लाख रुपये प्रति चौरस मीटर आणि तात्पुरत्या बांधकामासाठी ४०० रुपये प्रति चौरस मीटर शुल्क आकारला जाईल.