सर्वांनी हिंदी भाषा शिकणे गरजेचे!

मुख्यमंत्री डॉ. सावंत : गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठ, मडगावतर्फे सन्मान सोहळा

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
19th September, 11:56 pm
सर्वांनी हिंदी भाषा शिकणे गरजेचे!

नावेली: सर्वांनी हिंदी भाषा शिकणे गरजेचे आहे. प्रादेशिक भाषेला प्रोत्साहन देणे गरजेचे असले तरी ज्या प्रमाणे आपण सर्व भारत या एका देशासोबत जोडलो गेलो आहोत, त्याच प्रमाणे सर्व राज्यांना जोडणार्‍या या एका भाषेसोबत आपण एकसंध राहायला हवे. साहित्य क्षेत्रात हिन्दी भाषेतून कोकणी आणि कोकणी भाषेतून हिन्दी भाषांतर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रवींद्र भवन मडगाव येथील परिषद गृहात केले.

गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठ, मडगाव गोवाच्या ५० व्या वर्धापन दिनी आयोजित सोहळ्यात प्रमुख अतिथी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. सुनील कुलकर्णी (निदेशक, केंद्रीय हिन्दी निर्देशालाय, नवी दिल्ली ), दिगंबर कामत (आमदार, मडगाव), अॅड. नरेंद्र सावईकर (अनिवासी भारतीय आयुक्त गोवा सरकार), संतोषकुमार झा (अध्यक्ष, प्रबंध निदेशक कोकण रेल्वे), गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाच्या अध्यक्षा कृष्णी वाळके, गो.रा.वि. चे सचिव उदय बोरकर उपस्थित होते.

यावेळी आमदार दिगंबर कामत, अॅड. नरेंद्र सावईकर, कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा, प्रमुख वक्ते डॉ. सुनील कुलकर्णी आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच स्वाती सुर्लकर लिखित लहरे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेच्या संस्थापकांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला.

हिन्दी भाषेसाठी योगदान देणारे विनायक राघोबा नार्वेकर, डॉ. मेङ्ग्दालीन डिसूझा, डॉ. संदीप लोटलीकर, प्रा. करुणा सातार्डेकर, आदित्य सिनाय भांगी यांना स्मृतिचिन्ह, शाल- श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच प्रा. जॉयदीप भट्टाचार्य, प्रा. पूर्णकला सामंत, संतोष कुमार झा, सोनाली नागवेकर, अविनाश बोरकर, राजेंद्र तालक यांना सन्मान प्रदान करण्यात आले. स्वागत कृष्णी वाळके यांनी तर सूत्रसंचालन डॉ. किरण पोपकर यांनी केले.