वेळेत उपचार मिळाले असते, तर आराध्य वाचला असता...

शिर्डीहून परतताना अपघात : रेल्वेतून पडल्याने मडगावातील सातवर्षीय मुलाचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th September, 09:15 pm
वेळेत उपचार मिळाले असते, तर आराध्य वाचला असता...

मडगाव : शिर्डीतून देवदर्शन करुन परत येत असताना सातवर्षीय मुलगा रेल्वेतून पडून जखमी झाला. मात्र, त्याला उपचार मिळेपर्यंत तीन तासांचा अवधी निघून गेला. या काळात त्याला उपचार मिळाले असते तर सुदैवाने त्याचा जीव वाचला असता. मात्र, नियतीच्या मनात ते नव्हते.

पेडा मडगाव येथील आराध्य राजेश मांद्रेकर हा सातवर्षीय मुलगा सोमवार, दि. १६ रोजी पुण्यानजीक रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान इस्पितळात त्याचा मृत्यू झाला.

मांद्रेकर कुटुंबीय अन्य दोन कुटुंबीयांसह १३ सप्टेंबर रोजी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. १६ रोजी सायंकाळी ते गोवा एक्स्प्रेसने मडगावात परत येत होते. शिर्डीतून गोव्यात येत असताना रात्री झोपायची तयारी करत असताना इमर्जन्सी खिडकीकडील जागा रिकामी झाली. त्या जागेवर बसण्यासाठी आराध्य धावत गेला. त्याला एमर्जन्सी खिडकीचा अंदाज न आल्याने तो खिडकीतून बाहेर फेकला गेला. आराध्यच्या आईने हे पाहताच आरडाओरड केली असता सोबतच्या मंडळींनी रेल्वेची साखळी ओढत गाडी थांबवली. रेल्वेच्या अधिकार्‍यांकडून पुढील स्थानकावर उपचाराची सोय करतो, असे सांगण्यात आले व औंधनजीकच्या स्थानकावर त्यांना उतरवले. गाडीतून उतरताच त्याठिकाणी रुग्णवाहिका किंवा कोणतीही उपचाराची सोय नव्हती. कुटुंबीयांनी धावाधाव करत खासगी गाडीतून नजीकच्या इस्पितळात नेले. मात्र, दोन इस्पितळांनी गंभीर अवस्थेतील आराध्यला अ‍ॅडमिट करुन घेण्यास नकार दिला. त्यानंतर एका इस्पितळातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रथमोपचार करत रुग्णवाहिका देत पुण्यानजीकच्या मोठ्या इस्पितळात नेण्यास सांगितले. त्याठिकाणी जाईपर्यंत सुमारे तीन तासांचा अवधी उलटला होता. त्याठिकाणी उपचारादरम्यानच आराध्यचा मृत्यू झाला. गुरुवारी मांद्रे येथील मूळगावी आराध्यच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आराध्यच्या मृत्यूनंतर रेल्वेतील मुलांच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रेल्वेमधील इमर्जन्सी खिडकीची जागा सीटबरोबर असून ती थोड्या उंचीवर असती तर आराध्यचा तोल गेला नसता. याशिवाय चेन ओढल्यानंतर साधारणत: ७०० मीटर ते १ किलोमीटर अंतरावर गाडी थांबली. आराध्यला रात्रीच्या काळोखात शोधण्यास वेळ लागला. त्यानंतर रेल्वेस्थानकावर माहिती देऊनही उपचाराची सोय उपलब्ध करण्यात आलेली नव्हती. अपघात झालेल्या परिसरातील इस्पितळात योग्य सोय नसल्याने त्यांनी अ‍ॅडमिट करुन घेतले नाही, अशा अनेक बाबींवर आता चर्चा होत आहे.

सात वर्षांनी झालेला मुलगा नियतीने हिरावला

आराध्य हा मडगावातील लॉयला हायस्कूलमध्ये दुसरीत शिकत होता. १ सप्टेंबर रोजी मडगावातील एका हॉटेलमध्ये त्याचा सातवा वाढदिवस साजरा करण्यात आला. आराध्यच्या हट्टामुळे नातेवाईकांसह सर्व मित्रांनाही बोलावण्यात आले होते. मांद्रेकर कुटुंबीयांना सात वर्षांच्या कालावधीनंतर आराध्यच्या रुपाने मुलगा झाला होता. पण दुर्दैवाने देवदर्शन करुन येतानाच नियतीने त्याला हिरावून घेतल्याने मांद्रेकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.


हेही वाचा