गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील सहा अट्टल गुंडांना अटक

कळंगुट पोलिसांची कारवाई, सहा जणांनी पंजाबमधील विद्यार्थ्यांवर केला होता खूनी हल्ला

Story: उमेश झर्मेकर | गोवन वार्ता |
16th September, 04:28 pm
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील सहा अट्टल गुंडांना अटक

म्हापसा : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीतील सहा जणांना कळंगुटमध्ये पोलिसांच्या सहाय्याने मोहाली पंजाब पोलिसांनी अटक केली. दोघा महाविद्यालयीन युवकांवर खूनीहल्ला करून संशयित आरोपींनी गोव्यात आसरा घेतला होता. संशयित आरोपींवर पंजाबमध्ये एकूण १८ गंभीर गुन्हे नोंद आहेत. यश्विर जगदीश चौधरी (२१, रा. नोहका , राजस्थान), कपील सुरेंद्र खत्री (२२, रा. मोहाली,व मूळ हरियाणा), हर्ष राजकुमार तावर (१९, रा. मोहाली व मूळ हरियाणा), सौरव सतीश कुमार बैन्नीवाल (१९ रा. हरियाणा), अनूजकुमार जयपाल चौधरी (१९, रा. मोहाली व मूळ हरियाणा) व राहूल हिमराज डगर (२१, रा. फिरीदाबाद हरियाणा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

गेल्या दि. १२ सप्टेंबर रोजी पंजाब मधील मोहाली जिल्ह्यातील सिटी खरार पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका कॉलेजच्या आवारात हा खूनी हल्ल्याचा प्रकार घडला होता. फिर्यादी हरदीप मलीक व कुशल या दोघा विद्यार्थ्यांवर संशयित आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. दोघांवर सिटी खरार मधील इस्पितळात उपचार सुरू आहेत. 

हा हल्ला केल्यानंतर संशयित आरोपी पंजाबमधून पसार होत गोव्यात आले होते. रविवारी १५ रोजी सहाही संशयित आरोपी गोव्यात कळंगुट येथे वास्तव्यास असल्याची माहिती सिटी खरार पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर पंजाब पोलिसांनी कळंगुट पोलिसांशी संपर्क साधला. संशयित आरोपी माड्डोवाडा कळंगुट येथील हॉटेल स्मॉल डॅडीमध्ये असल्याची खात्री कळंगुट पोलिसांना झाली. त्यानंतर रात्री पोलीस निरीक्षक परेश नाईक व उपनिरीक्षक पराग पारेख यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने सदर हॉटेलवर छापा टाकला आणि संशयित टोळीला गजाआड केले. त्यानंतर संशयितांना पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सोमवारी सकाळी सिटी खरार पोलीस संशयितांना घेऊन पंजाबकडे रवाना झाले.

अटक केलेले हे सहाही संशयित आरोपी भारतीय गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्या टोळीशी संलग्न असल्याचे पंजाब पोलिसांचा संशय आहेत. गँगस्टर बिश्नोई हा सध्या तिहार कारागृहात बंदीस्त असून त्याच्याविरूध्द दोन डझन पेक्षा जास्त गुन्हे नोंद आहेत. तर वरील अटक केलेल्या संशयितांवर खुनी हल्ला, खंडणीसह एकूण १८ गुन्हे नोंद आहेत.

हेही वाचा