गोवा पोलीस, रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर

शिबिरात फायब्रोस्कॅन चाचणी तसेच हेपेटायटिसच्या ब आणि क च्या चाचण्या पार पडल्या

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
20 hours ago
गोवा पोलीस, रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर

पणजी : गोवा पोलिसांनी रोटरी क्लब, पर्वरी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आल्तिन्हो येथील जीआरपी हॉलमध्ये पोलिसांना जाणवणाऱ्या आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ५०० हून अधिक पोलीस अधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमांद्वारे येत्या २० महिन्यांत गोव्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.

या आरोग्य शिबिरात यकृताच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी केली जाणारी फायब्रोस्कॅन चाचणी तसेच हेपेटायटिसच्या ब आणि क प्रकाराशी निगडित चाचण्या पार पडल्या. त्याच बरोबर महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी देखील कर्करोगाशी निगडीत विविध चाचण्या करण्यात आल्या.

गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी या आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले. सुदृढ शरीर आणि चांगल्या आरोग्याचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले. पोलीस कर्मचाऱ्यांवर असलेल्या जबाबदारीचा विचार करता याप्रकारचे आरोग्य शिबिर महिन्यातून दोन वेळा आयोजित केले जाईल.

नियमित आरोग्य तपासणीच्या माध्यमातून गोवा पोलिसांत आरोग्याशी निगडित चांगली जीवनशैली, पोषक आहार व व्यायाम यांचा प्रसार-प्रचार व्हावा यासाठी तज्ज्ञ मंडळींच्या नेतृत्वाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.      

हेही वाचा