पोलिसांकडून वाहतूक सुरक्षा संदर्भात सरपंच, पंच सदस्यांना मार्गदर्शन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21 hours ago
पोलिसांकडून वाहतूक सुरक्षा संदर्भात सरपंच, पंच सदस्यांना मार्गदर्शन

फोंडा : फर्मागुडी येथे फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर व वाहतूक पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी फोंडा तालुक्यातील सरपंच व पंच सदस्यांना वाहतूक सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. बैठकीला विविध पंचायतीच्या सरपंच व पंच सदस्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. वाहतूक नियमाचे पालन करणे, अपघात नियंत्रणात ठेवणे, अमली पदार्थ या संदर्भात पोलिसांना माहिती देऊन अन्य विषयांवर जागृती करण्यात आली.

या बैठकीत बांदोडा पंचायतीचे सरपंच रामचंद्र नाईक, कुर्टी पंचायतीचे सरपंच हरीश नाईक, उपसरपंच साजिदा सय्यद, बेतकी - खांडोळा पंचायतीचे सरपंच विशांत नाईक, उसगाव पंचायतीचे पंच विलियम मास्कारेन्हास, प्रकाश उर्फ संजय गावडे, कवळे पंचायतीचे उपसरपंच सुशांत कपिलेश्वरकर व अन्य पंच सदस्य उपस्थित होते.
राज्यात वाढत्या अपघातामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घेताना इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. पंचायत क्षेत्रात एखाद्या वाहन चालकाकडून वाहतूक नियमाचे उ्लंघन होत असल्यास पंच सदस्यांनी पोलिसांना माहिती द्यावी. तसेच एखाद्या ठिकाणी अमली पदार्थाचा व्यवहार सुरू असल्यास त्याची सुद्धा माहिती देण्याची गरज असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी सांगितले.

पंचायत क्षेत्रात होणाऱ्या गुन्ह्यासंबंधी पंच सदस्यांनी जागृत राहणे आवश्यक आहे. एखादा गुन्हा होण्यापूर्वी पोलिसांना माहिती देण्याचा प्रयत्न करावा. गावात अंमली पदार्थांचे सेवन तसेच दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांची माहिती पोलिसांना दिल्यास त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. गुन्हे रोखण्यात पंच सदस्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी केले.

यावेळी अनेक पंच सदस्यांनी उंडीर- बांदोडा, फर्मागुडी व अन्य ठिकाणी अमली पदार्थांचा व्यवहार तसेच फर्मागुडी भागात युवावर्ग दुचाक्या घेऊन स्टंट करत असल्याचे निर्देशनास आणून दिले. तसेच धोकादायक अपघात घडत असून पंचायती तर्फे काही धोकादायक ठिकाण दर्शविणारे फलक लावण्याची तयारी यावेळी पंच सदस्यांनी व्यक्त केली.

वाहतूक नियमाचे पालन करून अपघात रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या ग्रामसभेत वाहतूक पोलिसांकडून जागृती करण्यात येणार आहे. ग्रामसभेत अवघ्या १०-१५ मिनिटांमध्ये वाहतूक पोलिसांकडून जागृती करण्यात येणार असून पंचायत मंडळाने सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी यावेळी केले. 

हेही वाचा