मालपे राष्ट्रीय महामार्गवरील कोसळलेली दरड हटवण्याचे काम सुरू

जून महिन्यात भिंतीसह दरड रस्त्यावर कोसळली.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21 hours ago
मालपे राष्ट्रीय महामार्गवरील कोसळलेली दरड हटवण्याचे काम सुरू

पेडणे: जून महिन्यात राष्ट्रीय महामार्ग ६६ मालपे बायपास रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने चार महिन्यापासून हा रस्ता सर्व वाहतुकीस बंद करण्यात आला होता. पर्यायी रस्ता म्हणून जो पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग १७ सुरू करण्यात आला होता.

राष्ट्रीय महामार्ग १७ धोकादायक स्थितीत असूनही त्याच रस्त्यावरून सर्व प्रकारची वाहतूक सुरू होती. सध्या पावसाचे प्रमाण कमी होत असून सरकारने संबंधित कंत्राटदाराला राष्ट्रीय महामार्ग ६६ या रस्त्यावरील दरड दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मालपे बायपास राष्ट्रीय महामार्ग तयार करत असताना कंपनीने रस्त्याच्या बाजूचे भले मोठे डोंगर श्लोप पद्धतीने न कापता सरळ रेषेत कापले होते. परिणामी गेल्या वर्षीपासून दरड कोसळण्याच्या घटना घडत होत्या.

याची दखल घेत सरकारने आणि कंत्राटदाराने संरक्षण भिंत उभारली होती. मात्र यंदा जून महिन्यात भिंतीसह दरड रस्त्यावर कोसळली. जून महिन्यात कोसळलेली दरड अजून पर्यंत रस्त्यावरच असून ती हटवण्यासाठी कंत्राटदाराने कोणत्याही उपाययोजना केल्या नव्हत्या. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

कंत्राटदारावर कोणती कारवाई करणार
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसाठी अभियंते आणि कंत्राटदार जबाबदार असून असा प्रकार आढळल्यास कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. याच अनुषंगाने मालपेतील दरड कोसळल्याप्रकरणी सरकार कंत्राटदारावर कोणती कारवाई करणार असा प्रश्न मालपेवासिय करत आहेत. 

हेही वाचा