इतिहासात प्रथमच कृषी खात्याकडून सर्वांना समान न्याय
पणजी : कृषी खात्याने यंदा प्रथमच जमिनींची कागदपत्रे नसलेल्या १,३०० शेतकऱ्यांना ७० लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली. गणेश चतुर्थीच्या आधीच भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमाही झालेली आहे, अशी माहिती कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी बुधवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
यंदाच्या मान्सून हंगामात जून आणि जुलै या दोन महिन्यांत राज्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली होती. त्यामुळे चतुर्थीपूर्वी सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणी विरोधकांनी सरकारकडे केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही ही मागणी मान्य करीत कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पंचनाम्याचे आदेश जारी केले. कृषी खात्याच्या पंचनाम्यात मुसळधार पावसामुळे कृषी कार्डधारक शेतकऱ्यांचे सुमारे तीन कोटींपेक्षा अधिक, तर कृषी कार्ड नसलेल्या तसेच भाजी उत्पादक शेतकऱ्यांचे ८० लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले. त्यानंतर खात्याने भरपाई देण्याच्या प्रक्रियेला गती देत, बहुतांशी शेतकऱ्यांना चतुर्थीआधीच भरपाई दिली. त्यात जमिनीची कागदपत्रे नसलेल्या १,३०० शेतकऱ्यांचा समावेश आहे.
आतापर्यंत ३.९१ कोटींच्या अर्थसहाय्याचे वाटप
- भरपाईसाठी कृषी खात्याकडे हजारो शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केलेले होते. त्यातील १,३०० शेतकऱ्यांकडे कसत असलेल्या जमिनींची कागदपत्रे नव्हती. हे शेतकरी कोमुनिदाद तसेच सरकारच्या पडीक जमिनी कसत असून, पावसामुळे त्यांची पिके, भाज्या वाहून गेल्या होत्या, असे संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले.
- यापूर्वीही राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असून, त्यांना कृषी खात्याने अर्थसहाय्य दिलेले आहे. परंतु, आतापर्यंत केवळ जमिनीची कागदपत्रे असलेल्या शेतकऱ्यांनाच अर्थसहाय्य देण्यात येत होते. यंदा मात्र खात्याने जमिनीची कागदपत्रे नसलेल्या १,३०० शेतकऱ्यांना ७० लाखांचे सहाय्य केले आहे, असे ते म्हणाले.
- आतापर्यंत हजारो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३.९१ कोटींचे अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे. काही मोठ्या शेतकऱ्यांचे नेमके नुकसान प्राप्त होण्यास उशीर झाल्याने त्यांना आता अर्थसहाय्य देण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.