स्वच्छ ऊर्जेचा वापर करणाऱ्या उद्योगांना पाठिंबा!

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : अमेझिंग गोवा समिटचे पणजीत उद्घाटन


09th November, 12:36 am
स्वच्छ ऊर्जेचा वापर करणाऱ्या उद्योगांना पाठिंबा!

अमेझिंग गोवा समीटमध्ये उपस्थित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री मॉविन गुदिन्हो, मंत्री सुभाष शिरोडकर, सुरेश प्रभू आणि श्रीनिवास धेंपो.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा सरकार स्वच्छ ऊर्जेचा वापर करणाऱ्या उद्योगांना पाठिंबा देणार आहे. याद्वारे गोव्याला हरित राज्य करण्याचा आमचा हेतू आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. शुक्रवारी पणजीत अमेझिंग गोवा समिटच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री मॉविन गुदिन्हो, जलसस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, विनय वर्मा, राजकुमार कामत, श्रीनिवास धेंपो यांच्यासह ५१ देशांतील २०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गोवा केवळ पर्यटन व्यवसायापुरता मर्यादित राहिलेला नाही. येथील नयनरम्य निसर्ग, तयार केलेल्या मूलभूत सोयी सुविधा, महामार्ग, दोन विमानतळ, रेल्वे, बंदर आदींमुळे येथे उद्योग करणे सोयीस्कर आहे. यामुळेच गेल्या काही वर्षांत येथे अन्न प्रक्रिया व अन्य हरित उद्योग वाढत आहेत. येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहेत. गोवा वेडिंग डेस्टिनेशन बनत आहे. येथे परिषदा, बैठक, अधिवेशने घेण्याचे प्रमाणही वाढले आहे.
ते म्हणाले, आम्ही सध्या एआय, ब्लॉक चेन, डेटा सिक्युरिटी, मत्स्य शेती, सायबर सुरक्षा अशा पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देत आहोत. उद्योजकांनी गोव्यात येऊन अशा उद्योगांत गुंतवणूक करावी. आम्हाला गोव्याला देशाचा आर्थिक केंद्र बिंदू बनवायचे आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करण्यासाठी आम्ही स्किकिंग, अप स्कीलिंग आणि रिस्किकिंग सुरू केले आहे. यामुळे गोव्यातील युवा पिढीला नवीन आव्हाने पेलण्यासाठी तयार करण्यात येत आहे.
अन्य ठिकाणांमध्ये आणि गोव्यात गुंतवणूक करण्यात फरक आहे. गोव्यात तुम्ही व्यापारही करू शकता आणि आनंदीही राहू शकता. येथील निसर्ग आम्हाला जपायचा आहे. गोव्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी उद्योग खात्यातर्फे वेगवेगळी धोरणे आणली जात आहेत. आम्हाला गोव्याला देशाचे ट्रेडिंग हब बनवायचे आहे.
_ मॉविन गुदिन्हो, उद्योगमंत्री
गोव्यात मिनी सिलिकॉन व्हॅली आणण्याचा विचार : गोयल
केंद्रीय उद्योग राज्यमंत्री पीयुष गोयल यांनी यावेळी आभासी पद्धतीने संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही गोव्यात मिनी सिलिकॉन व्हॅली आणण्याचा विचार करत आहोत. हे एक प्रकारचे डेटा सेंटर स्टोरेज असणार आहे. गोव्यातील पर्यावरणपूरक उद्योगांना केंद्र सरकार पाठिंबा देणार आहे.