बार्देश : बागा येथील खाडीत होणाऱ्या सांडपाण्याच्या निचऱ्याचा पर्यटकांना त्रास : मायकल लोबो

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
09th November, 04:11 pm
बार्देश : बागा येथील खाडीत होणाऱ्या सांडपाण्याच्या निचऱ्याचा पर्यटकांना त्रास : मायकल लोबो

म्हापसा : बागा-कळंगुट मलनिस्सारण प्रकल्पामध्ये प्रक्रियायुक्त सांडपाणी बागा खाडीत सोडता येणार नाही. कारण ही खाडी बागा समुद्रकिनार्‍याला जाडत असून याचा पर्यटनावर विपरित परिणाम होऊ शकतो, असा दावा आमदार मायकल लोबो यांनी केला.यावेळी सरपंच जोजफ सिक्वेरा, पंचायत मंडळ, पंचायत जैव विविधता समिती, कळंगुट मतदारसंघ मंच (सीसीएफ), कोमुनिदाद समिती व अधिकार्‍यांसमवेत आयोजित संयुक्त बैठकीत लोबो बोलत होते.

 या सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी साळगाव कचरा प्रकल्पात नेणारी प्रस्तावित वाहिनी अद्याप टाकायची आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी गावातील बागकाम आणि शेतीसाठी वापरले जाऊ शकते. मात्र बागा खाडीत ते जाऊ देता कामा नये. बागा समुद्रकिनारी आंगोळीसाठी येणार्‍या पर्यटकांना याचा त्रास होतो, असे लोबो म्हणाले. 

 योग्य  नियोजनाअभावी मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वित झाल्यास कळंगुटसाठी ही आपत्ती ठरेल. आम्ही साळगाव कचरा प्रकल्पाला जोडणार्‍या रिव्हर्स वाहिनीला आक्षेप घेतला कारण त्याचा जैवविविधेवर परिणाम होईल. त्याचप्रमाणे हा प्रकल्प योग्यरित्या कार्यान्वित न झाल्यास वाईट परिस्थिती उद्भवेल, असे दिवकर म्हणाले. दरम्यान हा प्रकल्प फक्त कळंगुटसाठी आहे. तरीही प्रकल्पात बार्देश तालुक्यातील इतरही काही भागांतील सांडपाणी इथे रिकामी केले जाते, असा दावा पंचायत मंडळाने केला.

 दरम्यान कळंगुट चर्च ते नागवा ड्रीम सर्कल दरम्यान, कळंगुटमधील चालू असलेल्या रस्त्याचे रूंदीकरण, बागा येथे नवीन जलवाहिनी व इतर विकास कामांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.  कळंगुट ते नागवा रस्त्याच्या रूंदीकरणाची योजना सादर करण्याची मागणी सीसीएफने केली व झाडे तोडण्यास आक्षेप घेतला. कळंगुट मधील सांडपाणीवाहू टँकर जे सध्या पणजी एसटीपी प्रकल्पात जातात त्यांना बागा प्रकल्पाची सुविधा वापरण्याची परवानगी देण्यात यावी असे कोमुनिदाद अ‍ॅटर्नी अँथनी डिसोझा म्हणाले. 

हेही वाचा