शवप्रदर्शनामुळे जुने गोवेतील रस्त्यांची कामे पूर्ण : पार्सेकर
आल्तिनो परिसरात सुरू असलेले रस्त्याचे हॉटमिक्सिंग. (नारायण पिसुर्लेकर)
पणजी : मान्सूननंतरच्या पावसाने राज्यात उसंत घेतली असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने राज्यातील बहुतांशी हॉटमिक्स प्लांट सुरू केले असून, रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणास गती दिली आहे. जुने गोवेतील शवप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण पूर्ण करण्यात आल्याची माहिती ‘पीडब्ल्यूडी’चे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी सोमवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
गत महिन्यात ‘पीडब्ल्यूडी’ने तेरापैकी अनेक प्लांट सुरू करून हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम सुरू केले होते. परंतु, त्याच काळात अधूनमधून पडलेल्या पावसाचा हॉटमिक्स प्लांट आणि रस्ते डांबरीकरणाला फटका बसला होता. त्यामुळे खात्याने काम थांबवले होते. परंतु, पावसाने पूर्णपणे उसंत घेताच खात्याने बहुतांशी प्लांट सुरू करून हॉटमिक्स डांबरीकरणास गती दिली आहे, असे पार्सेकर यांनी सांगितले.
यंदा राज्यात गोवामुक्तीपासूनच्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे काही महिन्यांपूर्वी बांधलेले रस्ते वाहून गेले. काही भागांतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने त्याचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागला. यावरून स्थानिक जनता आणि वाहन चालकांकडून रोष व्यक्त होण्यास सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ‘पीडब्ल्यूडी’ने २७ कंत्राटदारांसह ३० अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा जारी केल्या होत्या. कारवाई झालेल्या कंत्राटदारांनीही आपण बांधलेल्या रस्त्यांची कामे सुरू केली आहेत, असे त्यांनी नमूद केले.
अंतर्गत रस्त्यांचेही हॉटमिक्स डांबरीकरण करा
राज्यातील सर्वच भागांतील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. त्यामुळे वाहतुकीकोंडीसह अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे आपापल्या भागांतील रस्त्यांचे लवकरात लवकर हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.