कला अकादमी : कृती दल घेणार कंत्राटदाराकडून कामाची माहिती

विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज होणार बैठक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th November, 11:42 pm
कला अकादमी : कृती दल घेणार कंत्राटदाराकडून कामाची माहिती

पणजी : कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सरकारने स्थापन केलेले कृती दल मंगळवारी तज्ज्ञांच्या उपस्थितीत कंत्राटदारांकडून कामाचा तपशील घेणार आहे. या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदेचा तपशील आणि प्रत्यक्ष काम याविषयी दलाचे सदस्य कंत्राटदारांचे स्पष्टीकरण ऐकून घेणार आहेत.
कृती दलाचे अध्यक्ष विजय केंकरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी कृती दलाची बैठक होणार आहे. मनोरंजन संस्थेच्या कार्यालयात ही बैठक होणार असल्याची माहिती कृती दलाच्या सदस्यांनी दिली. कृती दलाने कला अकादमीची पाहणी केल्यानंतर बैठक घेतली. दरम्यान, मंगळवारी कृती दलाची दुसरी बैठक होणार आहे. या बैठकीला कंत्राटदार उपस्थित राहणार असल्याचे कृती दलाचे सदस्य देविदास आमोणकर यांनी सांगितले.
कला अकादमीच्या दुरुस्ती तसेच नूतनीकरणासाठी सरकारने ६० कोटींहून अधिक खर्च केला आहे. दुरुस्ती तसेच नूतनीकरणाच्या कामावर कलाकार किंवा चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशन दोघेही समाधानी नाहीत. डागडुजी व नूतनीकरणाच्या कामाची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी कला राखण मंच व इतर संघटनांनी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कला अकादमीची पाहणी करून अहवाल सादर करण्यासाठी कलाकारांच्या कृती दलाची स्थापना केली. विजय केंकरे हे कृती दलाचे अध्यक्ष आहेत. सरकार आणि कृती दल यांच्यातील समन्वय अधिकारी म्हणून प्रसाद लोलयेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती अभ्यास करून सरकारला अहवाल सादर करणार आहे.
स्टेज, खुर्च्यांबाबत कृती दल असमाधानी
या बैठकीला मंगळवारी होणाऱ्या कृती दलाच्या सदस्यांसह विद्युत आणि संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, दीनानाथ मंगेशकर सभागृहातील स्टेज आणि खुर्च्यांबाबत कृती पथकातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. नूतनीकरण आणि दुरुस्तीच्या कामातही कृती दल उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसे गुण देऊ शकत नसल्याचे निरीक्षण अध्यक्ष केंकरे यांनी व्यक्त केले होते.

हेही वाचा