फोंडा पोलिसांची कारवाई, भाजप कार्यकर्ती असल्याचे भासवत उकळले सुमारे १.२१ कोटी
फोंडा: सध्या राज्यात नोकरी घोटाळ्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत असून मिळालेल्या आकडेवारीनुसार या घोटाळेबाजांनी नोकरीसाठी फिरणाऱ्यांना करोडोंचा गंडा घातला आहे. प्रिया उर्फ पूजा यादव, पूजा नाईक उर्फ रूपा पालकर आणि दीपाश्री सावंत गावस या घोटाळेबाजांनंतर पोलिसांनी आणखी एका महिलेस अटक केली आहे. सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून सुमारे १.२१ कोटींचा गंडा घातल्या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून श्रुती प्रभूगावकर (पर्वरी) या महिलेला चौकशीनंतर फोंडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
श्रुती प्रभूगावकरला अटक केल्यानंतर तिच्याबद्दल माहिती समोर आली असून श्रुती ही महिला भाजपची कट्टर कार्यकर्त्या असून प्रचारामध्ये ती सक्रिय होती. तसेच पर्वरीमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली तिने विविध कार्यक्रम देखील आयोजित केले होते. विशेष म्हणजे तिचे भाजप नेत्यांशी जवळचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे ती भासवत होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. दरम्यान या नोकरी घोटाळा प्रकरणातील पूजा नाईक ही सुद्धा प्रादेशिक पक्षाच्या पणजीत एका कार्यालयात कार्यरत होती. तिने देखील आपल्या राजकीय ओळखीचा फायदा घेऊन अनेकांना सुमारे दोन कोटींचा गंडा घातला आहे.
दोन दिवसांपूर्वीच सरकारी नोकरी देण्यासाठी योगेश शेणवी कुंकळीकर (४९, ढवळी) या शिक्षकाने साडेबारा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली होती. अटक केलेलेल्या संशयिताने १ कोटी २० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून न्यायालयाने त्याला ३ दिवसाचा रिमांड दिला आहे. तर रविवारी रात्री म्हार्दोळ पोलिसांनी संशयित संदीप जग्गनाथ परब (तारीवाडा-माशेल) याच्यावरही गुन्हा नोंद करून त्यालाही अटक केली आहे.