जुवारी पुलावर दोन दुचाकींमधील अपघातात एकाचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th November, 12:22 am
जुवारी पुलावर दोन दुचाकींमधील अपघातात एकाचा मृत्यू

पणजी : जुवारी पुलावर बुधवार, दि. ६ रोजी झालेल्या दोन दुचाकींमधील अपघातात अन्वर सय्यद (५४, हाऊसिंग बोर्ड, घोगळ-मडगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आगशी पोलिसांनी हेमंत सी. टी. (२४, हासन-कर्नाटक) या दुसऱ्या दुचाकी चालकाला अटक केली आहे.
आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार ६ रोजी सायंकाळी ६ वाजता आगशीबाजूच्या जुवारी पुलावर यामाहा फसिनो आणि अॅक्टिव्हा या दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. दोन्ही दुचाकी पणजीहून मडगावच्या बाजूने जात होत्या. या दोन्ही वाहनांत अपघात होऊन अॅक्टिव्हा दुचाकी चालक अन्वर सय्यद गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच आगशी पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उदय पालकर व इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी हवालदार पालकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. त्यानुसार वरील दोन्ही दुचाकी पणजीहून मडगावच्या दिशेने जात होत्या. दरम्यान, जुवारी पुलावर पोहचताच दोन्ही दुचाकींमध्ये अपघात झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महिला उपनिरीक्षक दीपिका परवार यांनी यामाहा फसिनो दुचाकी चालक हेमंत सी. टी. याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.