राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गोव्यात स्वागत

आयएनएस हंसा तळाची पाहणी : राष्ट्रपतींना नौदलाच्या जवानांकडून मानवंदना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th November 2024, 12:27 am
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गोव्यात स्वागत

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई.

वास्को : देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पारगमन दौऱ्यावर गुरुवारी (दि. ७) सकाळी दाबोळी येथील भारतीय नौदलाच्या हंस तळावर आगमन झाल्यावर राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, शिष्टाचार मंत्री मॉविन गुदिन्हो व इतर मान्यवरांनी जोरदार स्वागत केले. दरम्यान, यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी नौदलाच्या आयएनएस हंसा तळाला भेट देऊन पाहणी केली. सदर कार्यक्रम पार पडल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिल्लीला रवाना झाल्या.
यावेळी राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मुख्य सचिव डॉ. व्ही. चंदावेलौ, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस आदी उपस्थित होते. राष्ट्रपतीचे आगमन झाल्यावर त्यांना नौदलाच्या १५० जवानांनी मानवंदना दिली. राष्ट्रपती भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या राष्ट्रपती दिनानिमित्ताने गोव्यात आल्या होत्या. दरम्यान त्यांच्या उपस्थितीत दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
युद्धनौका आयएनएस विक्रांतलाही दिली भेट
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कारवार येथे भारतीय नौदलाच्या तळाकडे जाण्यास निघाल्या. तेथे त्यांनी भारताच्या पश्चिम तळात देशातील सर्वात आधुनिक आणि सर्वात मोठी विमानवाहक नौका आयएनएस विक्रांतला भेट देऊन युद्धनौकेवर होणाऱ्या भारतीय नौदलाच्या विविध कामांची पाहणी केली. तसेच विक्रांतवरून समुद्रात होणाऱ्या विविध कवायती पाहिल्या. भारताने बांधलेली विक्रांत ही पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे. राष्ट्रपती या आयएनएस विक्रांतला प्रथमच भेट देत आहेत.