उघड्यावर शौच केल्यास मडगावात दंडात्मक कारवाई

पालिका मुख्याधिकाऱ्यांकडून नोटीस जाहीर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th November, 12:24 am
उघड्यावर शौच केल्यास मडगावात दंडात्मक कारवाई

मडगाव : मडगाव नगरपालिकेकडून पालिका क्षेत्रात उघड्यावर शौच केल्यास १०० रुपये दंड, तर उघड्यावर लघवी करताना आढळल्यास ५० रुपये दंड आकारण्यात येईल, अशा आशयाची जाहीर नोटीस मुख्याधिकाऱ्यांनी काढली आहे.
मडगाव पालिका क्षेत्रातील उघड्यावर शौच व लघवी करण्याच्या प्रकारात वाढ झाल्याचे आढळून आले आहे. परप्रांतातून आलेल्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात उघड्यावर घाण करण्याचे प्रकार घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर मडगाव पालिका मुख्याधिकारी मेलविन वाझ यांनी जाहीर नोटीस काढून नगरपालिका क्षेत्रात उघड्यावर शौच केल्यास व लघवी केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा दिलेला आहे. या नोटीशीनुसार उघड्यावर शौच करताना आढळल्यास प्रथम १०० रुपये व त्यांनतर शंभर रुपयांच्या पटीत दरवेळी दंडात वाढ केली जाईल. तसेच उघड्यावर लघवी करताना आढळल्यास प्रथम ५० रुपयांचा व त्यानंतर प्रत्येकीवेळी ५० रुपयांच्या पटीत दंडात वाढ केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
सरकारच्या राज्य शौचमुक्त दाव्यावर प्रश्नचिन्ह
मडगावातील समाज कार्यकर्ते प्रभव नायक यांनी मडगाव पालिकेच्या या निर्णयावर भाष्य करताना राज्य सरकारने राज्य शौचमुक्त जाहीर केलेले असताना मडगाव पालिकेच्या जाहीर नोटीशीमुळे राज्य सरकारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे म्हटले आहे.