अमेरिकेत १९ हजार मेट्रिक टनांची निर्यात : सद्यस्थितीत मात्र वाढीव आयात शुल्काचा फटका

पणजी : गोव्यातून गेल्या पाच वर्षांत अमेरिकेत सुमारे १९ हजार मेट्रिक टन कोळंबीची (सुंगट) निर्यात झाली आहे. मात्र, अलीकडे अमेरिकेने भारतावर आयात शुल्क (टॅरिफ) वाढवल्यामुळे गेल्या एका वर्षात ही निर्यात मोठ्या प्रमाणात घटली असून, सध्या गोव्यातून अमेरिकेत जाणारी कोळंबी निर्यात जवळपास बंद अवस्थेत पोहोचली आहे, अशी माहिती वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिली आहे.
मंत्रालयाने जाहीर केलेल्या समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या (एमपीईडीए) अहवालानुसार, २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत गोव्यातून १९,२७९ मेट्रिक टन गोठवलेली कोळंबी अमेरिकेत निर्यात करण्यात आली. या निर्यातीमधून सुमारे ११४ दशलक्ष डॉलर, म्हणजेच जवळपास ८८२ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. सरासरी पाहता या कोळंबीला प्रति किलो ४०० ते ५०० रुपये दर मिळाला.
देशभरातून याच कालावधीत ३४,८७,०३० मेट्रिक टन गोठवलेल्या कोळंबीची निर्यात झाली असून, त्यात गोव्याचा वाटा फक्त ०.५५ टक्के इतका आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या राज्यांतून अमेरिकेला कोळंबीची निर्यात होते. अमेरिकेला कोळंबी निर्यात करणाऱ्या राज्यांमध्ये गोवा दहाव्या क्रमांकावर, तर दिल्ली अकराव्या क्रमांकावर आहे.
२०२१-२२ ते २०२३-२४ या कालावधीत गोव्यातून अमेरिकेला होणाऱ्या कोळंबी निर्यातीत सातत्याने वाढ नोंदवण्यात आली होती. २०२१-२२ मध्ये सुमारे ३ हजार मेट्रिक टन असलेली निर्यात २०२३-२४ मध्ये वाढून सुमारे ५ हजार मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली होती. मात्र, त्यानंतर भारत आणि अमेरिकेमधील व्यापार तणाव वाढला आणि अमेरिकेने आयात शुल्क वाढवल्याचा थेट फटका गोव्याच्या कोळंबी निर्यातीला बसला.
वाढीव टॅरिफमुळे देशातील ११ पैकी ८ राज्यांमधून अमेरिकेला होणारी कोळंबी निर्यात प्रभावित झाली. विशेषतः ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ आणि ऑगस्ट ते डिसेंबर २०२५ या कालावधीत गोव्यातून अमेरिकेला कोळंबीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्याची नोंद आहे. परिणामी, मत्स्य व्यवसायाशी संबंधित निर्यातदार, प्रक्रिया उद्योग आणि शीतगृह व्यवसायावरही परिणाम झाला आहे.
| वर्ष | निर्यात (मे. टन) | मूल्य (कोटी रु.) |
|---|---|---|
| २०२०-२१ | ४७५६ | २१३ |
| २०२१-२२ | ३५७८ | १८८ |
| २०२२-२३ | ३९५९ | १९० |
| २०२३-२४ | ५०३५ | २१३ |
| २०२४-२५ | १९५१ | ७८ |