यापुढे टेबल टेनिसच नव्हे तर बॅडमिंटन, क्रिकेट सुद्धा खेळणार

पणजी : मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत आणि मी एकत्र आहोत. पक्षासाठी एकत्र राहून आम्ही काम करतो. मुख्यमंत्र्यांच्या खाली मी नंबर दोनचा मंत्री आहे, असे स्पष्ट करताना यापुढे बॅडमिंटन, क्रिकेट सुद्धा एकत्र खेळण्याची शक्यता नगरनियोजन (TCP) मंत्री विश्वजीत राणे यांनी वर्तवली.
मिरामार (Miramar), पणजी (Panjim) कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना मंत्री विश्वजीत राणे यांनी ही बाब स्पष्ट केली. बोंडवेल तळ्याचा विषय घेऊन सांताक्रुझचे ग्रामस्थ नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांना भेटायला आले होते. ग्रामस्थांकडे चर्चा केल्यानंतर चर्चेची माहिती देताना विश्वजीत राणे यांनी हे वक्तव्य केले.
मुख्यमंत्री आणि मी टेबल टेनिस खेळ असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. टेबल टेनिसच नव्हे तर यापुढे आम्ही बॅडमिंटन वा क्रिकेट सुद्धा एकत्र खेळणे शक्य आहे. आम्ही एकत्र नाही, असा एक समज आहे. मुख्यमंत्री आणि मी पक्ष तसेच लोकांसाठी काम करतो. जो काही निर्णय मी घेतो, तो मी सरकार प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांना कळवतो. दोघांचेही उद्दिष्ट आणि व्हीजन एकच आहे. पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी आम्ही एकत्र काम करणार, असे नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.