दक्षिण गोवा जिल्हा खासदार विरियातो फर्नांडिस यांचा दावा

पणजीः ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) सुरक्षेचे कारण देऊन दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) नागरी उड्डाणासाठी बंद करण्याची फाईल संरक्षण मंत्रालयाने जारी केली होती. या विषयी सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून हस्तक्षेप केल्या कारणाने या फाईलला स्थगिती देण्यात आली. पण आतून अजूनही हा विमानतळ बंद करण्याचा डाव चालू आहे, असा आरोप दक्षिण गोवा जिल्हा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला.
पणजी (Panjim) कॉंग्रेस (Congress) हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॅ. विरियातो बोलत होते. यावेळी दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा, उत्तर गोवा कॉंग्रेस अध्यक्ष विरेंद्र शिरोडकर उपस्थित होते.
दाबोळी विमानतळ हा पोर्तुगीज काळापासून अस्तित्वात आहे आणि गोवा मुक्त झाल्यानंतर त्याचा वापर सैन्यासाठी व्हायला लागल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.
आंध्र प्रदेशातील कंपनी जीएमआर मोपा विमानतळ हाताळते आणि याच कंपनीचा हैद्राबाद राजीव गांधी विमानतळ पण आहे. पण हा विमानतळ चालवण्यास घेण्याआधी या विमानतळाजवळ आणखी विमानतळ असायला नकोत; अशी अट घालण्यात आली होती. आणि या अटीमुळे जवळ असलेला फायद्यात चालणारा विमानतळ बंद केला; असा दावा फर्नांडिस यांनी केला.
गेली तीन वर्षे झाली मोपा विमानतळ २६६ कोटी रुपये एवढे नुकसान सोसून चालतो आणि हे आकडे त्यांच्या ‘बॅलन्स शीट’मधून आले आहेत. त्यांना या नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी दाबोळी विमानतळ बंद पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे, असा आरोप विरियातो यांनी केला. तसेच विमानतळ बंद पाडण्यासाठी दोन षडयंत्रे कशी सुरू आहेत याची माहिती दिली.
दाबोळी विमानतळाजवळ उड्डाणपूल बांधण्याचे काम हातात घेण्यात आले होते. पण या उड्डाणपुलासाठी नौदलाची परवानगी घेतली आहे का नाही असा प्रश्न मी राष्ट्रीय महामहार्गाच्या अधिकाऱ्यांना केल्यानंतर केंद्र सरकारच्या कामांना नौदलाची परवानगी लागत नाही; असे उत्तर त्यांनी दिले. पण परवानगी घेण्यासाठी नौदलाने राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना चार नोटिसा पाठवल्या होत्या, असे फर्नांडिस यांनी सांगितले.
पण या उड्डापुलाविरोधात लोक न्यायालयात गेल्यावर राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना नौदलाची परवानगी घेण्याचा आदेश दिला. परवानगीच्या वेळी दिसून आले की, जे खांब उड्डाणपुलासाठी बांधले होते, ते विमानतळाच्या पातळीवरून खूप उंच होते आणि पूल झाल्यानंतर मोठ्या विमानांना उतरण्यास अडचण होऊन केवळ नौदलाची फायटर विमाने उतरू शकतील. हा विमानतळ बंद पाडण्यासाठी सरकारने उड्डाणपुलाचे षडयंत्र चालवले, असा आरोप विरियातो यांनी केला.
जेव्हा मी संसदेत होतो, तेव्हा सूत्रांकडून चौकशी सुरू केली, तेव्हा कळून चुकले की, ऑपरेशन सिंदूर नंतर सुरक्षेच्या कारणासाठी दाबोळी विमानतळ बंद करण्यासाठी फाईल मंजूर झाली आहे. हे कळल्यनंतर मी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून विचारले चीन-पाकिस्तान सीमेवरील सर्व विमानतळ नागरी उड्डाणासाठी चालू असताना केवळ गोव्यात कसला सुरक्षेचा प्रश्न येतो? तेव्हा या फाईलला स्थगिती देण्यात आल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.
पण आतून अजूनही हा विमानतळ बंद पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गोव्यात आले तेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि स्थानिक आमदार तसेच मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सिंह यांची भेट घेऊन दाबोळी बंद पडणार नाही, असे आश्वासन सिंह यांनी दिल्याचे सांगितले.
१५ दिवसांनंतर परत त्यांनी दिल्ली येथे सिंह यांची भेट घेऊन हीच कहाणी पुन्हा सांगितली. आणि तिसऱ्या वेळी मॉविन गुदिन्हो हे एकटेच सिंह यांना भेटले. जर पहिल्याच वेळी आश्वासन दिले होते तर तीन वेळा मॉविन हे एकटेच सिंह यांना का भेटले असा प्रश्न फर्नांडिस यांनी केला.