बफर झोन निश्चित करण्याची जबाबदारी पाणथळ प्राधिकरणाची

पणजी : सांताक्रुझ (Santa Cruz) येथे २०० मीटर परिघात कसल्याच प्रकारच्या बांधकामांना परवाने देऊ नयेत, असे निर्देश नगरनियोजन (TCP) खात्याला दिले आहेत. या विषयीचा निर्णय नगरनियोजन मंडळाच्या बैठकीत होणार. बोंडवेळ तळ्याचा बफर झोन निश्चित करण्याची जबाबदारी पाणथळ प्राधिकरणाची आहे, असे नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले.
बोंडवेल तळ्याच्या परिसरात बांधकामांना मान्यता देऊ नये, अशी मागणी सांताक्रुझ ग्रामस्थांनी केली आहे. बोंडवेल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आर्थुर डिसोझा, इनासियो पेरेरा आणि इतर ग्रामस्थांनी सोमवारी नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांची भेट घेतली. नगरनियोजन मंत्र्यांनी ठोस आश्वासन दिल्याबद्दल ग्रामस्थांनी मंत्र्यांचे आभार मानले.
कायद्याप्रमाणे सरकार वा नगरनियोजन खाते निर्णय घेते. बोंडवेल तळ्याचा बफर झोन (Buffer Zone) २०० मीटर आहे. त्यामुळे २०० मीटर परिघात बांधकामांना मान्यता देणार नाही. या विषयीचा अधिकृत निर्णय नगरनियोजन मंडळाच्या बैठकीत होणार. बफर झोन किती असावा याचा निर्णय पाणथळ प्राधिकरण घेणार.
बफर झोन १५० मीटर करण्याची मागणी आहे. मात्र, हा विषय नगरनियोजन खात्याच्या अखत्यारीत येत नाही. बोंडवेल तळ्याच्या परिसरात बोरवेल खोदण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले. बोरवेल खोदण्यास परवानगी नगरनियोजन खाते देत नाही. नगरनियोजन खाते नियमाप्रमाणे मान्यता देते. लोकांच्या हिताचा विचार करून सरकारने कायदे तसेच नियम तयार केले आहेत, असे नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.