तिसवाडी : नाविन्यपूर्ण उत्पादनांमुळे अमेझिंग गोवा मधील स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
09th November, 03:38 pm
तिसवाडी : नाविन्यपूर्ण उत्पादनांमुळे अमेझिंग गोवा मधील स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद

पणजी : तळणाच्या तेलापासून बायोडिझेल, हवे तसे दुमडता येणारे फोल्डेबल सौर पॅनल, पेटंट प्राप्त विंड टर्बाइन, ४० टक्के वीज बचत करणारे हायब्रीड थर्मल पॅनल, शेतातील कचऱ्याची विलेव्हाट लावणारे ॲप, छोटेखानी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अशा नाविन्यपूर्ण उत्पादनांमुळे 'अमेझिंग गोवा' मधील स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहक केंद्री सेवा असल्याने ग्राहकांना या उत्पादनांचा फायदा होणार आहे. 


आपल्या रोजच्या जेवणात तळलेल्या पदार्थांचा समावेश असतो. तळण्यासाठी एकच तेल वारंवार वापरल्यास आरोग्यास धोका निर्माण होतो. त्यामुळे हृदयरोग व अन्य विकार होण्याची शक्यता असते. याचा विचार करून मुंझर या कंपनीने वापरलेल्या तळणाच्या तेलापासून बायोडीझेल बनवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. कंपनीतर्फे गोव्यातील मोठ्या हॉटेलमधून तळलेले तेल विकत घेतले जाते. नंतर या तेलाचे बायोडिझेल बनवून ते विविध कामांसाठी इंधन म्हणून वापरले जाते.


अर्बन ॲक्सिस ही कंपनी हायब्रीड थर्मल सौर पॅनल तयार करते. हे पॅनल ७.५ टना पेक्षा अधिक मोठ्या सेंट्रल एसीला लावल्यास यात वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे विजेचे बिल २५ ते ४० टक्के कमी येते. मोठे सभागृह किंवा कार्यालयात याचा वापर होऊ शकतो. केव्हीबी या कंपनीने सौर उर्जेवर चालणारे ड्रायर, सौर कुकर तयार केले आहेत. ड्रायरचा वापर मोठ्या प्रमाणात नारळ, मिरच्या, मासे, मसाले आदी पदार्थ वाळवण्यासाठी केला जातो. तर सौर कुकर चा वापर करून शंभरहून अधिक लोकांचे जेवण तयार केले जाते.


शेख लिक या कंपनीद्वारे फोल्डेबल म्हणजेच दुमडता येणाणारे सौर पॅनल तयार केले आहेत. कंपनीने व्यावसायिक आणि घरगुती वापरासाठी वेगवेगळी उत्पादने काढली आहेत. यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते उपलब्ध जागेच्या स्वरूपानुसार लावता येतात. सौर पॅनल साठी जागा अपुरी पडत असल्याने कंपनीने ही उत्पादने बाजारात आणली आहेत. कंपनीने काही ठिकाणी पूर्णपणे उभ्या भिंतीवर पॅनल बसवले आहेत. तर काही ठिकाणी घराच्या छपरावर त्याच आकाराचे पॅनल बसवले आहेत.

हेही वाचा