प्रिया यादवविरुद्ध डिचोलीत आणखी एक गुन्हा दाखल

लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th November, 12:19 am
प्रिया यादवविरुद्ध डिचोलीत आणखी एक गुन्हा दाखल

डिचोली : डिचोली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रिया यादव विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. रेल्वेत तसेच इतरत्र नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून चार बहिणींकडून ७९.२३ लाख आणि सुमारे १५० ग्रॅम सोन्याचे दागिने असा सुमारे एक कोटी रुपयांना गंडा घातल्याची तक्रार बोर्डे येथील जयंती रघुनाथ वायंगणकर यांनी दाखल केली आहे.
डिचोलीचे पोलीस उपाधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डे-डिचोली येथील जयंती वायंगणकर यांनी डिचोली पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीत वायंगणकर यांनी सन २०१७ ते जून २०२४ दरम्यान डिचोली येथे आरोपी प्रिया यादव हिने सुमारे ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला. आरोपीने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी खोटी कारणे सांगून जमिनीची खरेदी, रेल्वे स्टॉल आणि इतर विविध कारणे सांगून सोन्याचे दागिने देण्यास प्रवृत्त केले. या दागिन्यांमध्ये बांगड्या, ३ अंगठ्या आणि एका ब्रेसलेटचा समावेश होता. मात्र, संशयित महिलेला नोकरीचे दिलेले आश्वासन पाळण्यात आणि तक्रारदाराला फसवणूक केलेले पैसे परत करण्यात अपयश आले.
दरम्यान, आरोपी प्रिया यादवने तक्रारदार जयंती वायंगणकर यांच्या इतर ३ बहिणींचीही फसवणूक केली असून यामध्ये ललिता हिचे ३६ लाख रुपये आणि ११६.६३० ग्रॅम वजनाचे दागिने, मीलन हिच्याकडील राेख रक्कम ४ लाख ५० हजार रुपये, तर पूर्णा हिची रोख रक्कम ३ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी आयपीसी कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.


पूजा नाईकला दोन दिवसांची कोठडी

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी अटक केलेल्या पूजा नाईक हिला गुरुवारी (दि.७) दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.