प्रियाकडून रेल्वेत नोकरीची थाप
प्रिया यादव
प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : प्रिया ऊर्फ पूजा यादव हिने मुलगी आजारी आहे, आईला कॅन्सर आहे आणि रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून डिचोली परिसरातील अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडवले आहे. चार बहिणींना सुमारे ८० लाखांना फसवले आहे. अन्य एका तक्रारदाराला सुमारे दीड कोटी रुपयांना फसवले आहे. काहींना ‘हनी ट्रॅप’मध्ये गुंतवल्यामुळे अनेकजण तक्रार करण्यासही पुढे येत नाहीत, असे एका तक्रारदाराने सांगितले. तक्रारदाराच्या मते तिने सुमारे २५ कोटींचा घोटाळा केला आहे.
रेल्वेसाठी आपली जमीन गेल्यामुळे तिथे पाच नोकऱ्या मिळतील, त्या नोकऱ्या तुम्हाला दिल्या जातील, असे सांगून प्रियाने अनेकांकडून लाखो रुपये घेतले. मुळात एकही नोकरी दिली नाही; पण रेल्वेत नोकऱ्या देण्याचे गाजर दाखवूनच अनेकांकडून पैसे उकळले. त्यातील काहींनी तक्रारी दाखल केल्या आहेत. अनेकजण तक्रारीसाठी पुढे येत नसल्यामुळे तिचे कारनामे उघड झालेले नाहीत. आलेल्या तक्रारींवरून ती पैशांसाठी कुठल्याही प्रकारची कारणे देऊन लोकांना भावनिक ब्लॅकमेल करायची. आपल्या आईला कॅन्सर झाला म्हणून खोटे फोटो लोकांना पाठवण्यासह आपली मुलगी आजारी असल्याची कारणे देऊन पैसे घ्यायची. पैसे परत मागण्यासाठी लोकांनी तगादा लावल्यानंतर मुलगी मेल्याचे सांगून लोकांना तिचे खोटे फोटोही पाठवायची. तिच्या मदतीसाठी म्हणून अनेकांनी लाखो रुपये दिले. काहींना जास्त व्याजाने रक्कम परत करणार, असे सांगून फसवल्याचीही प्रकरणे आहेत. एक नव्हे तर कितीतरी कारणे देऊन, आमिषे दाखवून पूजा उर्फ प्रियाने लोकांना कोट्यवधी रुपयांना फसवले. पैशांसाठी कुठल्याही थराला जाणाऱ्या पूजा उर्फ प्रिया यादवने आपल्या नावावर कुठलीच मालमत्ता ठेवलेली नाही. लोकांकडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही तिने घेतले. सर्व मालमत्ता नातेवाईकांच्या नावावर असल्यामुळे तिच्या या अजब कारनाम्यांची चर्चा डिचोली परिसरात सध्या सुरू आहे.
पैशांसाठी चक्क मुलगी मेल्याचा खोटा बनावही !
गेल्या सात वर्षांपासून पूजा यादव लोकांना फसवत आहे. कोल्हापुरातील जमीन रेल्वे रुळासाठी गेल्यामुळे आपल्याला पाच नोकऱ्या मिळणार आहेत, त्या तुम्हाला देतो, असे ती सुरुवातीला सांगायची. नंतर जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून गुंतवणूक म्हणून पैसे घेत होती. नंतर मुलीला आजारी पाडून तिला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येणार आहे, असे सांगूनही लोकांना फसवल्याची अनेक प्रकरणे डिचोली परिसरात चर्चेत आहेत. एका तक्रारदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे, तिच्याकडे पैसे परत मागितल्यानंतर ते मुलीच्या उपचारासाठी खर्च झाले आणि आजारपणात मुलगी मेल्याचाही खोटा बनाव तिने केला.
राजकीय ओळखी वापरून पूजा नाईकने गंडविले
प्रतिनिधी । गोवन वार्ता
फोंडा : सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घालणारी पूजा नाईक ऊर्फ रूपा पालकर ही २०१२-१३ मध्ये राज्यातील एका प्रादेशिक पक्षाच्या पणजीतील कार्यालयात कार्यरत होती. तेथील ओळखीचा फायदा घेऊन तिने त्या काळात दहा जणांना सरकारी नोकरी दिल्याचीही धक्कादायक माहिती अलीकडेच समोर आली होती.
२०१२ ते २०२४ या बारा वर्षांच्या काळात संशयित पूजा नाईक हिने सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवत अनेकांना सुमारे दोन कोटींचा गंडा घातल्याचा अंदाज आहे. याशिवाय म्हार्दोळ पोलिसांनी पूजाच्या घरावर छापा टाकून सरकारी नोकरी संदर्भातील सुमारे ५० जणांचे अर्ज जप्त केले आहेत. पूजा नाईक हिने एका तक्रारदाराच्या मुलाला वाहतूक खात्यात कनिष्ठ लिपिकाची नोकरी देण्याच्या बहाण्याने चार लाख रुपये उकळले होते. दुसऱ्या मुलाला सार्वजनिक बांधकाम खात्यात (पीडब्ल्यूडी) अभियंत्याची नोकरी देण्याचे आमिष दाखवून दहा लाख रुपये घेतले होते. या तक्रारीची दखल घेऊन म्हार्दोळ पोलिसांनी पूजा हिच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा साथीदार अजित सतरकर यालाही अटक केली.
राजकीय नेत्यांचे फोटो दाखवून दीपाश्रीकडून फसवणूक
फोटो : दीपाश्री सावंत गावस
प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी दीपाश्री सावंत गावस हिला अटक केली आहे. दीपाश्री सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहे. दोन्ही संशयितांनी राजकीय नेत्यांसोबतचे फोटो दाखवून अनेकाना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.आमिष दाखवण्याच्या पद्धतीत बरेचसे साम्य असल्यामुळे पूजा नाईक आणि दीपाश्री यांच्यात कनेक्शन असल्याचा संशय आहे.
उसगाव येथील एका महिलेला माशेल येथील हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी देण्यासाठी पोलीस कर्मचारी असलेल्या सागर नाईकने तिच्याकडून १५ लाख रुपये घेतले होते. सदर रक्कम सागरने आपली मामी तथा मुख्याध्यापिका असलेल्या सुनीता पाऊसकर यांच्यामार्फत दीपाश्रीला दिली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून सागर व सुनीता पाऊसकर यांना अटक केली. साथीदारांच्या अटकेची माहिती मिळाल्यावर मुख्य सूत्रधार दीपाश्री गायब झाली होती. त्यामुळे फोंडा पोलिसांनी तिच्याविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली होती.
बेळगावहून गोव्यात परतत असताना फोंडा पोलिसांनी दीपाश्रीला मोले चेक नाक्यावर अटक केली. दीपाश्रीच्या ३ आलिशान कार व २ स्कूटरही पोलिसांनी जप्त केल्या. सावर्डे भागातील व्यक्तीने सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सागर नाईकने १० लाखांना फसवल्याचा गुन्हा फोंडा पोलिसांत नोंदवला आहे. सदर रक्कम सागरने दीपाश्रीला दिली असल्याने फोंडा पोलीस दीपाश्रीला अटक करणार आहेत. दीपाश्री सध्या ५ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे.