मध्यस्थाकडून म्हार्दोळ पोलिसांत तक्रार दाखल : सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणूक
फोंडा : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखोंना गंडविणाऱ्या दीपाश्री सावंत गावस हिचा मोठा कारनामा उघड झाला आहे. तिने ४४ जणांकडून अंदाजे ४ कोटी रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार गुरुवारी म्हार्दोळ पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे सदर तक्रार दीपाश्रीपर्यंत पैसे पोचविण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या संदीप परब यांनी केली आहे. दीपाश्री अटकेत असल्यामुळे लोक परब यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावत होते. त्यामुळे त्यांनी म्हार्दोळ पोलीस ठाणे गाठले.
संदीप परब यांच्या वतीने अॅड. शैलेश गावस यांनी या संदर्भात माध्यमांना माहिती दिली. दीपाश्री सावंत हिने नोव्हेंबर २०२३ मध्ये सर्व प्रथम दुकानदार संदीप परब यांच्याशी ओळख केली. त्यानंतर काही राजकीय नेत्यांसोबतचे फोटो दाखवून तिने आपण सरकारी कर्मचारी असल्याने इच्छुकांना ओळखीच्या राजकीय क्षेत्रातील लोकांकडून सरकारी नोकऱ्या देण्याचे आमिष दाखविले. संदीप परब यांनी सर्वप्रथम आपल्या मुलीला नगरनियोजन खात्यात नोकरी देण्यासाठी ८ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्यापैकी ३ लाख आगाऊ देण्यात आले.
दीपाश्री सावंत हिने आणखी नोकऱ्या देण्यासाठी संदीप परब यांना आमिष दाखवून अनेक जणांकडून रक्कम घेण्याचा आदेश दिला. त्यानुसार संदीप परब यांनी ४४ जणांकडून अंदाजे ४ कोटी रुपये घेऊन दीपाश्री सावंत हिला दिले. दरम्यान, या प्रकरणी म्हार्दोळ पोलिसांत उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
(म्हार्दोळ येथे पत्रकारांना माहिती देतांना अॅड. शैलेश गावस व संदीप परब.)
२५.८० लाख केले परत...
सरकारी नोकऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, त्यानंतर काही जणांना संशय आल्याने रक्कम परत मागविण्यास सुरुवात झाली. त्यापैकी २५ लाख ८० हजार रुपये दीपाश्री सावंत हिने संदीप परब यांच्याकडे परत केले होते.
परब यांच्या मुलीला धमक्या
पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल केल्यानंतर अधिक माहिती देताना अॅड. शैलेश गावस म्हणाले, सध्या संदीप परब यांच्या मुलीला धमक्या देण्यास सुरुवात झाली आहे. सरकारी कागदपत्रांचा वापर करूनच सरकारी नोकऱ्या देण्याची आमिषे दाखविण्यात आली आहे. राजकीय नेत्याशी संपर्क असल्याचे फोटो दाखवून अनेक जणांची फसवणूक करण्यात आली आहे. याला कुणाचा तरी आशीर्वाद असल्याने राज्यात सध्या फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येते. लोकांची फसवणूक करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दीपाश्रीला ५ दिवसांची कोठडी
सरकारी नोकरी देण्यासाठी लाखो रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी अटक केलेल्या दीपाश्री सावंत गावस हिला गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्तींनी ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, फोंडा पोलिसांनी यापूर्वी दीपाश्री सावंत हिच्या मालकीच्या तीन कार व दोन स्कुटर जप्त केल्या आहेत.
दीपाश्री-पूजाचे कनेक्शन!
सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणारी दीपाश्री सावंत आणि पूजा नाईक यांच्यात कनेक्शन असल्याचा आरोप अॅड. शैलेश गावस यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दबावाला बळी न पडता सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदार अॅड. शैलेश गावस यांनी केली आहे.
विविध पदांवर भरतीचे गाजर...
म्हार्दोळ पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दीपाश्री सावंत हिने ४४ जणांना विविध सरकारी खात्यांत कनिष्ठ लिपिक, तांत्रिक साहाय्यक, स्टेनोग्राफर, अबकारी निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, एमटीएस तसेच इतर पदांवर नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. तसेच सर्वाधिक रक्कम २० लाख, तर कमीतकमी ३ लाख रुपये घेण्यात आल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.