‘हुप्पा हुय्या’ बाल अंकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

आजपासून बाजारात उपलब्ध : विशेषांकात कथा, कविता, चित्रकथा, नाटिका यांचा खजिना


08th November, 11:57 pm
‘हुप्पा हुय्या’ बाल अंकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

‘हुप्पा हुय्या’ विशेषांकाचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत संपादक पांडुरंग गावकर आणि लौकिक शिलकर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बाल दिनाच्या निमित्ताने ‘गोवन वार्ता’च्या वतीने दरवर्षी ‘हुप्पा हुय्या’ हा गोव्यातील एकमेव बाल विशेषांक प्रसिद्ध केला जातो. यंदाच्या ‘हुप्पा हुय्या’ बाल विशेषांकाचे प्रकाशन शुक्रवार, ८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दै. ‘गोवन वार्ता’चे संपादक पांडुरंग गांवकर आणि ‘प्रुडंट’टीव्हीचे सहयोगी संपादक लौकिक शिलकर उपस्थित होते. हा विशेषांक शनिवारपासून राज्यातील सर्व वर्तमानपत्र वितरक, तसेच अन्य बुक स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. ११६ पानी या विशेषांकाची किंमत फक्त १०० रुपये आहे.
हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान मिळवण्यासाठी, तसेच मनोरंजनासाठी सर्रास मोबाईलचा वापर होताना दिसत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे दृष्टीदोषासह अन्य तोटेही होण्याची शक्यता आहे. लहान मुलांमध्ये वाचनाची आवड जोपासण्यासाठी त्यांना आवडेल, त्यांच्या ज्ञानात भर पडेल असे साहित्य त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत त्यांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे. हीच गरज ओळखून ‘गोवन वार्ता’ने बाल विशेषांक प्रसिद्ध करणे सुरू केले आहे. दरवर्षी या अंकाला बालक, पालक आणि शाळांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
यंदा बालकांच्या कला-गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने ‘हुप्पा हुय्या’ विशेषांकातर्फे राज्यातील इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांसाठी ‘महाचित्रकला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण २१६ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. स्पर्धेचे परीक्षण करण्याची जबाबदारी रदिमा जोगळे, वृषाली मेथा आणि नारायण पिसुर्लेकर यांनी पार पाडली. स्पर्धेत विराज गावस, नीरज पाटील आणि अवनी नाईक यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. याशिवाय बारा तालुक्यांतून प्रत्येकी एक उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी चित्र निवडण्यात आले. तसेच परीक्षकांनी काही चित्रांची शिफारस केली. या सर्व चित्रांसह तीन उल्लेखनीय चित्रांचाही या विशेषांकात समावेश करण्यात आला आहे.
....
या विशेषांकात आहे....
१३ कथा
११ कविता
१ चित्रकथा
१ नाटिका
.....
ज्ञानात भर घालणारी माहिती
गोव्यातील पारंपरिक व्यवसाय
गोव्यातील सापांच्या प्रजाती
गोव्यातील गावांची नावे
विस्मृतीत गेलेले काही खेळ