तिसवाडी : दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाद्वारे 'कलर्स ऑफ रेझिलियन्स'चे आयोजन

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
09th November, 03:25 pm
तिसवाडी : दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाद्वारे 'कलर्स ऑफ रेझिलियन्स'चे आयोजन

पणजी :  दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाच्या वतीने "कलर्स ऑफ रेझिलियन्स" चे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध कलाकार, कवयित्री आणि दिव्यांगांच्या सक्षमीकरणाचा पुरस्कार करणाऱ्या फ्रेडरिका मिनेझिस यांच्या संकल्पननेतून दिव्यांग व्यक्तींमध्ये  जागरुकता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोगाचे सचिव ताहा हाजिक यांनी दिली. शनिवारी पर्वरीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 हा कार्यक्रम शुक्रवार १५  ते १७ नोव्हेंबरदरम्यान वायंगिणी किनाऱ्यावरील ताज सिदाद दि गोवा हेरिटेजमध्ये होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत १५ रोजी संध्याकाळी ६ ते ८.३० दरम्यान "प्रिव्ह्यू फेलोशिप"चे आयोजन करण्यात आले आहे. तर १६ व १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत कलाप्रदर्शन होणार आहे. याशिवाय कार्यक्रमात प्रदर्शन, चर्चासत्रे आणि वैविध्यपूर्ण कलाप्रकारांचे प्रदर्शन असणार आहे, असे ताहा हाजिक म्हणाले.  

दिव्यांग व्यक्तींच्या कलात्मक प्रतिभेचे प्रदर्शन घडवणे, चित्रकला, शिल्पकला अशा विविध कलांच्या माध्यमातून आपले अनोखे दृष्टिकोन व्यक्त करणे हे कलर्स ऑफ रेझिलिन्सचे उद्दिष्ट आहे. प्रदर्शनामध्ये सादर होणाऱ्या सर्व कलासाहित्याचा लिलाव करण्यात येणार आहे. याद्वारे मिळालेल्या उत्पन्नाचा काही वाटा थेट संबंधित कलाकारांना दिला जाणार आहे. तसेच या निधीतून दिव्यांग सक्षमीकरण, प्रवेशसुलभता आणि समावेशनाला सक्रियपणे प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक संस्थांना पाठबळ दिले जाणार आहे.

१५ नोव्हेंबर रोजी "प्रिव्ह्यू फेलोशिप"मध्ये  प्रसिद्ध एस्टोनियन शिल्पकार तावनो कांग्रो हे प्रत्यक्ष शिल्पनिर्मिती करणार असून या शिल्पाचाही लिलाव करून निधी उभारला जाणार आहे. यावेळी मनोज दास हे प्रत्यक्ष चित्रकृती सादर करणार आहेत.

निधी शर्मा यांच्या ऑनसाइट चित्रकृतीही लिलावासाठी ठेवण्यात येणार आहेत. संतूर विशारद आणि संगीतकार नवाब खान यांचे सायंकाळी होणारे संतूरवादन कार्यक्रम होणार असल्याचेही हाजीक यांनी सांगितले.

हेही वाचा