जीवे मारण्याचा प्रयत्न; पुराव्याअभावी संशयिताची सुटका

संशयिताच्या पत्नीने २०१९ मध्ये कोलवा पोलिसांत तक्रार केली होती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th September, 06:56 pm
जीवे मारण्याचा प्रयत्न; पुराव्याअभावी संशयिताची सुटका

मडगाव : दारुच्या नशेत पत्नीला शिवीगाळ करत मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी संशयित बाबू नाईक तलवार याची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने सुटका केलेली आहे. याप्रकरणी पत्नी संगीता नाईक हिने २०१९ मध्ये कोलवा पोलिसांत तक्रार केली होती.

कार्मोणा येथील संगीता नाईक यांनी केलेल्या तक्रारीनुसार, ९ सप्टेंबर २०१९ रोजी बाबू नाईक तलवार याने सायंकाळी मद्यपान केल्यानंतर पत्नी संगीता हिच्याकडे जेवण मागितले. संगीताने बाबू तलवारला जेवण दिले असता त्याने संगीताला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मुलगा पीटर याने याबाबत बाबूला विचारणा केली असता त्यादोघांमध्ये बाचाबाची झाली.

रागाच्या भरात बाबू तलवारने किचनमधील चाकूने पीटरच्या पोटात वार केला. यावेळी संगीता हिने आरडाओरड केल्यानंतर शेजारी मदतीला धावले व त्यांनी पीटरला इस्पितळात दाखल केले. संगीता हिने कोलवा पोलिसांत आपल्या मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बाबू नाईक तलवार याच्या विरोधात तक्रार दिली होती.

याप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयात न्यायाधीश क्षमा जोशी यांनी घेतलेल्या सुनावणी वेळी सबळ पुराव्याअभावी संशयित बाबू नाईक तलवार याची मुक्तता करण्यात आली. याप्रकरणी संशयित बाबू तलवार याच्या बाजूने अ‍ॅड. सिंथिया परब उर्फ हर्षिता गावस देसाई यांनी बाजू मांडली होती.