अपघात प्रवण क्षेत्रांचे चिन्हांकन व्हावे : आमदार मायकल लोबो

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
19th September, 03:41 pm
अपघात प्रवण क्षेत्रांचे चिन्हांकन व्हावे : आमदार मायकल लोबो

पणजी : राज्यात अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी रस्त्यांची स्थिती, बांधकाम व इतर घटक तसेच वाहनचालक देखील तितकेच जबाबदार आहेत. दरम्यान याच प्रश्नावर आज आमदार मायकल लोबो यांनी पोलीस महासंचालक आलोक कुमार यांची भेट घेतली. पोलिसांनी वाहतूक तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह रस्त्यांची पाहणी करून अपघात प्रवण क्षेत्रे चिन्हांकित करावीत अशी मागणी यावेळी मायकल लोबो यांनी केली. तसेच रस्त्याच्या दुरावस्थेस कारणीभूत संबंधित कंत्राटदारांवर देखील कडक कारवाई करावी असे देखील त्यांनी म्हटले.    

एका वर्षांत अंदाजे ३०० हून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. योग्य त्या उपाय योजना लागू करून लोकांचा जीव कसा वाचवता येईल यावर लक्ष केंद्रित करावे अशी मागणी घेऊन त्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली होती. आमदार केदार नाईक तसेच आमदार दिलायला लोबो देखील यावेळी उपस्थित होत्या. अपघात प्रवण क्षेत्रांत योग्य सूचना फलक लावण्यात यावे अशी मागणी वाहतूक खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील पंचायत व नगरपालिकांना पत्र पाठवले होते. यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. वाहन चालकांना एकूणच रस्ता आणि तेथील धोक्याची माहिती व्हावी यासाठी ते आवश्यक आहे. निष्काळजीपणे वागणाऱ्या कंत्राटदारांवर योग्य कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्र्याना आग्रह करणार असल्याचे लोबो म्हणाले. 

पालक देखील तितकेच जबाबदार 

गाडी चालवण्याचा परवाना नसताना देखील अनेक अल्पवयीन गाड्या चालवतात. योग्य प्रकारे प्रशिक्षण नसल्याने त्यांचे अपघात होतात. त्यांच्या हातून बऱ्याचदा अपघात घडून अनेकांच्या जिवावर बेतले आहे. विना परवाना गाडी चालवणाऱ्यांवर तसेच त्यांच्या पालकांवरही काठोर कारवाई व्हावी अशी मागणी आमदार दिलायला लोबो यांनी केली.   


हेही वाचा