राज्य सहकारी बँकेत लवकरच युपीआय सुविधा

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
19th September, 03:05 pm
राज्य सहकारी बँकेत लवकरच युपीआय सुविधा

पणजी : गेल्या काही वर्षात राज्य सहकारी बँक तोट्यातून पुन्हा नफ्यात आली आहे. सध्या बँक अन्य खाजगी बँकांसोबत स्पर्धा करण्याची तयारी करत आहे. यासाठी बँकेद्वारे लवकरच युपीआय, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी दिली. गुरुवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पांडुरंग कुर्टीकर , अनंत चोडणकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

फळदेसाई यांनी सांगितले की, बँक २०१२ अखेर ६८.३६ कोटी रुपये तोट्यात होती. यानंतर सरकारचा आधार आणि आमच्या प्रयत्नाने तोटा कमी होत गेला. मार्च २०२४ अखेर बँक ४.२८ कोटी रुपये नफ्यात आहे. मागील एका वर्षात बँकेची अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) १०.३ वरून ४.१७ टक्के इतकी कमी झाली आहे. या आर्थिक वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय सुमारे २१ कोटी रुपयांनी वाढला आहे. सध्या बँकेची स्थिती चांगली आहे. म्हणूनच १४ वर्षानंतर प्रथमच बँकेने यंदा ३ टक्के लाभांश जाहीर केला आहे.

बँकेची स्थापना २ फेब्रुवारी १९६४ रोजी झाली होती.

यंदा बँकेने ६० वर्षे पूर्ण केली आहेत. स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्यात सहकार क्षेत्र रुजावे यासाठी बँकेची स्थापना केली होती. गेल्या साठ वर्षात बँकेने कदंब, ईडिसी, संजीवनी साखर कारखाना अशा अनेक प्रकल्पांना मदत केली आहे. १९९७-९८ नंतर मात्र काही कारणांसाठी बँकेची स्थिती खालावत गेली. मात्र त्यावर मात करत आम्ही बँकेला पुन्हा नफ्यात आणल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

फळदेसाई यांनी सांगितले, बँकेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या पाटो येथील मुख्यालयात दुपारी तीन वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच सहकार मंत्री सुभाष शिरोडकर उपस्थित राहतील. यावेळी बँकेसाठी चांगली काम केलेल्या माझी अध्यक्षांचा तसेच अन्य सहकारी संस्थांचा सत्कार होणार आहे .

हेही वाचा