परप्रांतीय कामगारांमुळे कुटबण जेटीवर कॉलराची लागण : मत्स्योद्योगमंत्री

कामगारांची तपासणी करण्याची जबाबदारी आता बोटीच्या मालकांची

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21 hours ago
परप्रांतीय कामगारांमुळे कुटबण जेटीवर कॉलराची लागण : मत्स्योद्योगमंत्री

पणजी : कुटबण तसेच मोबोर जेटीवर परप्रांतीय कामगारांकडून कॉलराचा संसर्ग झाला. तपासणीसाठी डॉक्टरांची सोय असतानाही कामगारांनी निष्काळजीपणा केला. यापुढे कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्याची जबाबदारी बोट मालकांची असेल, असे मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी स्पष्ट केले.

मासेमारीचा हंगाम सुरू झाल्याने कारवारसह इतर भागातूनही कामगार आले. यातील काही कामगारांना कॉलरा झाला होता. कुटबन जेटी येथे तपासणीसाठी डॉक्टर उपलब्ध आहेत. मात्र, या कामगारांची वैद्यकीय तपासणी झाली नाही. या कामगारांमुळे कॉलरा पसरला होता. कुटबन जेटीच्या बाजूला आरोग्य केंद्र आहे. जर स्वच्छता नसेल तर कॉलरा पसरू शकतो, असे हळर्णकर म्हणाले. हंगामाच्या सुरुवातीला सर्व कामगारांची आरोग्य तपासणी केली पाहिजे. यापुढे आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी बोट मालकांची असेल, असे मंत्री हळर्णकर यांनी सांगितले.

कॉलरा आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. हा रोग कीटक किंवा डासांमुळे होत नाहीत. स्वच्छता नसल्यास कॉलरा पसरतो. यामुळे आता जेटी स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. जेटीच्या स्वच्छतेचा मुद्दा पर्यावरण तसेच बंदर कप्तान खात्याकडेही येतो. यामुळे पर्यावरण खाते कारवाईचा निर्णय घेईल, असे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले. 

शौचालय उभारणीसाठी ५ ते ६ महिने मुदत

मासेमारीचा हंगाम सुरू झाल्याने जुन्या बोटींवर शौचालये बांधण्यासाठी काही महिन्यांची मुदत मिळणार आहे. ही मुदत ५ ते ६ महिने देण्याची तयारी आहे. शौचालये बांधण्यास पूर्णपणे सूट दिली जाणार नसल्याचे मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी स्पष्ट केले आहे. जुन्या बोटींवर शौचालय बांधणे सक्तीचे करू नये, अशी मागणी अखिल गोवा पर्ससीन बोट मालक संघटनेचे अध्यक्ष हर्षद धोंड यांनी केली आहे. याविषयी संघटनेकडून पत्र आल्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले.

हेही वाचा