जुन्या बोटींवर शौचालय बांधण्याची सक्ती नको : बोट मालक संघटनेची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th September, 02:49 pm
जुन्या बोटींवर शौचालय बांधण्याची सक्ती नको :  बोट मालक संघटनेची मागणी

पणजी : मासेमारी हंगाम नुकताच सुरू झाला आहे. अशातच सरकारने बोटींवर कामगारांच्या संख्येनुसार शौचालय बांधण्याची सूचना केली आहे. जुन्या बोटींवर शौचालय बांधण्याची सक्ती करु नये अशी मागणी अखिल गोवा पर्सेसिन बोट मालक संघटनेचे अध्यक्ष हर्षद धोंड यांनी केली. याबाबत संघटनेने मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना पत्र लिहून शौचालय बांधण्याची अट शिथिल करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. 

 मत्स्योद्योग खात्याने १३ सप्टेंबर रोजी आदेश काढून १५ कामगार असणाऱ्या बोटीवर एक तर ३० कामगार असणाऱ्या बोटीवर ३ शौचालये बांधण्यास सांगितले आहे. मात्र त्यासाठी बोटीच्या तळापासून काम करावे लागेल. यंदा खराब वातावरणामुळे मासेमारी हंगाम सुरू होण्यास वेळ लागला आहे. अशात पुन्हा शौचालय बांधायचे म्हटल्यास आणखी वेळ होऊ शकतो. या बोटी पाण्यामुळे हलत असल्याने बायो टॉयलेट उभारणे देखील शक्य नाही असे धोंड यांनी म्हटले. 

 राज्यात सुमारे ३५० पर्सेसिन बोटी आहेत. यातील १५० बोटींवर शौचालय आहे. २०१७ नंतर बांधण्यात आलेल्या सर्व बोटींवर शौचालय बांधण्यात आली होती. सरकारने यापुढे नवीन बोट बांधणाऱ्यांना शौचालय बांधणे सक्तीचे करावे असे धोंड म्हणाले.   जे लोक वर्षानुवर्ष शौचालय शिवाय बोट चालवत आहेत त्यांना यातून वगळावे. आता शौचालय बांधायचे झाल्यास आणखी एक महिना वेळ लागू शकतो. त्यामुळे मत्स्योद्योग मंत्र्यांनी यावर विचार करावा अशी धोंड यांनी विनंती केली आहे.

हेही वाचा