काँग्रेसच्या रस्ते शेणाने सारवण्याच्या आंदोलनाला यश

‘पीडब्ल्यूडी’कडून रस्त्यांच्या डांबरीकरणास सुरुवात; स्थानिकांत समाधान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21 hours ago
काँग्रेसच्या रस्ते शेणाने सारवण्याच्या आंदोलनाला यश

कुडचडे : येथील खराब रस्ते शेणाने सारवण्याच्या प्रदेश काँग्रेसच्या आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने (पीडब्ल्यूडी) तत्काळ तेथील रस्त्यांच्या डांबरीकरणास सुरुवात केली आहे. कुडचडेप्रमाणे इतर ठिकाणच्या रस्त्यांबाबतही अशीच आंदोलने छेडून ‘पीडब्ल्यूडी’ला रस्त्यांचे डांबरीकरण करण्यास भाग पाडणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

यंदा पडलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील रस्त्यांची अवस्था​ बिकट झालेली आहे. पावसामुळे काही भागांतील रस्ते वाहून गेले आहेत. तर, अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. अशा रस्त्यांवर प्रवास करताना वाहन चालकांच्या नाकीनऊ येत आहेत. शिवाय खराब रस्त्यांमुळे राज्यातील अपघातांचे प्रमाण आणि त्यात मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्यांबाबत भीषण परिस्थिती असताना आणि सध्या पाऊस नसतानाही पीडब्ल्यूडीकडून रस्त्यांची कामे सुरू होत नाहीत. त्यामुळे काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून राज्यभर आंदोलन सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी काही दिवसांपूर्वी इतर पदाधिकाऱ्यांसह कुडचडेतील खड्डेमय रस्ते शेणाने सारवण्याचे आंदोलन छेडले होते. त्यामुळे ‘पीडब्ल्यूडी’ने तत्काळ तेथील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतल्याने स्थानिक आ​णि वाहन चालकांत समाधान पसरले आहे.

सरकारी इमारती, कचऱ्यावरूनही​ निशाणा

- काँग्रेसने रस्त्यांसोबतच बिकट स्थितीत असलेल्या सरकारी इमारती आणि वाढत्या कचऱ्याबाबतही आंदोलनाचे हत्यार उगारले आहे.

- प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी बुधवारी ‘पीडब्ल्यूडी’च्या केपे येथील कार्यालयास भेट दिली असता, संबंधित कार्यालयाच्या स्लॅबचा भाग कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून आले.

- हे भाग कोसळून तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी ‘पीडब्ल्यूडी’चे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर यांच्यावर निशाणा साधला.

- कुडचडेतील कचरा समस्येवरून सरकारवर टीकास्र सोडले. 

हेही वाचा