सासष्टी : प्रादेशिक भाषांसह हिंदी भाषेला प्रोत्साहन : मुख्यमंत्री

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th September, 01:22 pm
सासष्टी : प्रादेशिक भाषांसह हिंदी भाषेला प्रोत्साहन : मुख्यमंत्री

मडगाव : प्रादेशिक भाषेच्या वादात अडकून पडण्यापेक्षा, इंग्रजीतून शिक्षण घेण्यापेक्षा विविध भाषा जाणून घेतल्यास त्याचा फायदा जास्त होणार आहे. शिक्षण क्षेत्रातही प्रादेशिक भाषेसह हिंदी भाषेला प्रोत्साहन दिले जात आहे. प्रत्येकाला कोकणीसह हिंदी भाषा येण्याची गरज आहे. राज्यात याआधी इंग्रजीतून येणारे सरकारी आदेश आता हिंदी भाषेतूनही येत आहेत. ही सरकारची प्रगती आहे. संवादातील अडचणी दूर करत अनेक राज्यांतूनही दुहेरी भाषेतून अनुवाद केला जातो, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले.

 मडगाव रवींद्र भवन येथील सभागृहात गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार दिगंबर कामत, गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठ अध्यक्ष कृष्णी वाळके, कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोषकुमार झा,केंद्रीय हिंदी समितीचे सुनील कुलकर्णी, माजी खासदार नरेंद्र सावईकर आदी उपस्थित होते. शशिकला काकोडकर व सहकार्‍यांनी या विद्यापीठाची सुरुवात केली होती. या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, गोव्याच्या स्वातंत्र्याला १४  वर्षे विलंब झाला तेव्हा गोव्याची भाषा कोकणी होती. गोव्यातील लोक मराठी भाषा वाचत होते पण त्यावेळी हिंदी भाषेचे जाणकार फारच कमी होते. महाराष्ट्र, कर्नाटक व केरळमधूनही काही लोक गोव्यात आले व याचठिकाणी स्थायिक झाले. यामुळे कन्नडचा प्रभावही गोव्यात वाढल्याचे दिसून आला. 

एक देश विविध भाषा, विविध वेश असतानाही हिंदी भाषेला राष्ट्रभाषा घोषित केली. देशातील काही प्रांत हिंदीला राष्ट्रभाषा मानण्यास तयार नव्हते. त्यावेळी केंद्र सरकारने राष्ट्रभाषा प्रचारासाठी प्रयत्न सुरु केले. अजूनही काही राजकीय पक्ष  हिंदीला आवश्यक तो मान देताना दिसत नाहीत. प्रादेशिक भाषेला प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. त्याचबरोबर देशात बोलली जाणारी हिंदी भाषाही वाचता, बोलता व लिहिता येणे आवश्यक आहे. काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत एका भाषेमुळे देश एक झालेला दिसतो, कोणत्याही प्रदेशात गेल्यास नागरिकांशी संवाद साधणे सोपे जाते. गोव्यात कोकणी, मराठी, इंग्रजीसह हिंदी भाषाही बोलली जात आहे, शिकवली जात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. विकसित भारत २०४७  सह विविधतेतून एकता कायम राखण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पहिले आहे. जरी आपण विविध प्रांतातील असो, विविध संस्कृती, विविध भाषेचे असलो तरी आपण भारतीय आहोत, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्याला हिंदी अनुवादकांची गरज भासणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री असतानाच राजभाषा मंत्री म्हणूनही कार्यरत आहे. या नात्याने राज्यात भाषा संशोधन विभागाची सुरुवात केलेली आहे. राज्यभाषा संचालनालयातर्फे कोकणीतून हिंदी व हिंदीतून कोकणी व इतर भाषांत अनुवाद केला जात आहे. महत्त्वाची कागदपत्रे संवर्धनासाठी ऑफिशिअल लँग्वेज रिसर्च सेल बंगलोर यांच्याशी करार झालेला असून राज्याला अजूनही हिंदी भाषा जाणणार्‍या अनुवादकांची गरज भासणार आहे. भाषा शिकल्यासह करिअर होउ शकते, हे जाणून घेत शिक्षण घ्यावे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा