कुटबण जेटीवर बोट लावण्यासाठी जागा देण्यास नकार

मंत्री सिक्वेरा यांच्याकडून कुटबण जेटीची पाहणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21 hours ago
कुटबण जेटीवर बोट लावण्यासाठी जागा देण्यास नकार

मडगाव : मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी बुधवारी कुटबण जेटीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वच्छतागृह तसेच उभ्या करण्यात आलेल्या बोटींची पाहणी केली. यावेळी सहा छोट्या बोटी भंगारात काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. बोटमालकांनी काही बोटी उभ्या करण्यासाठी जागा देण्याची मागणी केली पण, त्यास मंत्र्यांनी नकार दिला.

कुटबण जेटीवरील कॉलरा साथीच्या पार्श्वभूमीवर मंत्री सिक्वेरा यांनी जेटीची पाहणी केली. मंत्री सिक्वेरा यांनी सांगितले की, कॉलराची साथ पसरलेली असल्याने जेटीवरील बोटी हटवण्यात येत आहेत व जेटीची स्वच्छता केली जात आहे. मच्छीमारांना बोटी ठेवण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, अशी मागणी बोटमालकांनी केली पण, मंत्र्यांनी त्यास नकार दिला, बोट काढण्यासाठी काहीवेळ दिला जाऊ शकतो, असेही स्पष्ट केले. ज्या सहा बोटी भंगारात काढण्याचे ठरवण्यात आलेले आहेत, त्याच्या मालकांनी त्या भंगारात काढून हा विषय संपुष्टात आणावा. बोटमालकांकडून शौचालयांची उभारणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांची उभारणीही लवकरच केली जाणार आहे. सुलभ शौचालयाचा प्रश्न आला असता सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू नाही, तो लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. कामगारांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी नवी जलवाहिनी टाकण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मार्गी लावण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांसह पाहणी केली त्यावेळी १०० पेक्षा जास्त बोटी दिसून येत होत्या, आता केवळ वीसच्या आसपास बोटी दिसत आहेत.

सीआरझेडकडून परवानगी दिल्याचे खोटे दावे : मंत्री सिक्वेरा

भूतानी प्रकल्पाला १५ फेब्रुवारी २००८ व ८ ऑगस्ट २००८ या दिवशी सीआरझेड प्राधिकरणाकडून दोन ना हरकत दाखले देण्यात आल्याचे समाजमाध्यमावर पाहिले. गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथोरिटीकडून कोणत्याही प्रकारची परवानगी भूतानी प्रकल्पाला देण्यात आलेली नाही, असे सांगत कुणाकडे अशाप्रकारची परवानगी दिल्याचा पुरावा असल्यास सादर करावा, असे आव्हानही त्यांनी दिले. काही चुकीचे झालेले असल्यास ते दुरुस्त करण्याची तयारी आहे पण कोणत्याही प्रकारे जनतेची दिशाभूल करू नये, असे आवाहन पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी केले. 

हेही वाचा