म्हापसा-बार्देश: तोतया पोलिसांनी वृध्द दाम्पत्याला गंडवले; लाखोंचे दागिने घेऊन काढला पळ

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
19th September, 04:48 pm
म्हापसा-बार्देश: तोतया पोलिसांनी वृध्द दाम्पत्याला गंडवले; लाखोंचे दागिने घेऊन काढला पळ

म्हापसा : राज्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी उच्छाद मांडला आहे. गोव्यात ऐन चतुर्थीच्या काळात चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. मुख्य म्हणजे अशा घटनांचा आलेख कायम वाढतच असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जातो. आता म्हापसा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  आज दुपारी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बस्तोडा येथील अंडरपास जवळ एका दाम्पत्याला दोघांनी अडवले व आपण पोलीस असल्याची बतावणी केली. पुढे चोरीचा प्रकार घडला असून तुम्ही आपले दागिने सांभाळा असे म्हणत दोघा तोतया पोलिसांनी त्या दाम्पत्याकडील बॅग तपासणीसाठी घेतली व तेथून पोबारा केला. सदर बॅगमध्ये लाखों रुपयांचे दागिने होते. 

 याप्रकरणी नंदकुमार रायकर (७६, रा. कारोणा-हळदोणा) यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. तक्रारीनुसार, आपल्या पत्नीसह म्हापसाहून हळदोणच्या दिशेने दुचाकीवरुन जात होते. बस्तोडा अंडरपासखाली पोचले असता मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी या दाम्पत्याला अडविले. तुम्ही ट्रॅफिक सिग्नल तोडला आहे. तुमचा वाहन परवाना (लायसन्स) दाखवा. असे सांगताच फिर्यादीने लायसन्स घरी असल्याचे सांगितले. तसेच आम्ही कोणताही ट्रॅफिक सिग्नल तोडलेला नाही, असे सांगितले.

 त्यानंतर या संशयित तोतया पोलिसांनी पुढे मोठी चोरी झाली असून तुमच्या अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवा असे दाम्पत्यास सांगितले. त्यानुसार रायकर यांच्या पत्नीने आपल्या अंगावरील  मंगळसूत्र, तोडे व पाटल्या हे दागिने काढून पिशवीत ठेवले. त्यावेळी संशयितांनी ते दागिने बाहेर काढण्यास सांगितले व कागदामध्ये गुंडाळण्याचे नाटक करून दागिन्यांसह घटनास्थळावरून पलायन केले.

 हे दोघेही तोतया पोलीस काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आले होते व हिंदी भाषेत बोलत होते. आम्ही सीबीआयचे पोलीस अधिकारीआहोत, असे भासवून संशयितांनी दाम्पत्याला लुबाडले.  याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या २०४, ३०३ व ३(५) कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


हेही वाचा