मॉडेलला ड्रग्ज पाजून लैंगिक अत्याचार प्रकरणातून अनंत तन्ना आरोपमुक्त

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
5 hours ago
मॉडेलला ड्रग्ज पाजून लैंगिक अत्याचार प्रकरणातून अनंत तन्ना आरोपमुक्त

पणजी : गुजरात येथील एका २० वर्षीय मॉडेलला ड्रग्ज पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने संशयित अनंत छमनलाल तन्ना याच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला होता. दरम्यान, गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेवरच्या आदेशाची दखल घेत सत्र न्यायालयाने तन्ना याची आरोपातून सुटका केली आहे.

पणजी येथील मानवी तस्करी विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानुसार, पीडित मॉडेलने तक्रार दाखल केली होती. संशयित अनंत छमनलाल तन्ना याने गुजरात येथे मॉडेलशी मैत्री केली. तिला व्यवसायात भागीदारी देण्याच्या नावाखाली नोव्हेंबर २०२१ मध्ये गोव्यात बोलावून घेतले होते. गोव्यात आल्यानंतर तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याशिवाय मोबाईलवर व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करून तिची मानवी तस्करी केली. याशिवाय संशयितांच्या चार मित्रांनीही तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. याची दखल घेऊन पणजी येथील मानवी तस्करी विभागाच्या तत्कालीन महिला पोलीस निरीक्षक संध्या गुप्ता यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी अनंत तन्ना याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन संशयिताला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. याप्रकरणी तपास पूर्ण करून अनंत छमनलाल तन्ना याच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२२ रोजी पोलीस निरीक्षक रीमा नाईक यांनी प्रकरणाची कसून चौकशी करून पुराव्यासह न्यायालयात प्रकरण बंद करण्याचा अहवाल आणि पुरवणी आरोपपत्र दाखल केले. दरम्यान, न्यायालयाने वरील बंद अहवालाची आणि पुरवणी आरोपपत्राची दखल न घेता तन्ना याच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवून १५ फेब्रुवारी २०२४ रोजी आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला. याला तन्ना याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर उच्च न्यायालयाने संशयिताने केलेल्या दाव्यात तथ्य असल्यामुळे त्याच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश रद्द करून पुन्हा सुनावणी घेण्यास सांगितले होते. त्यानुसार सत्र न्यायालयाने पुन्हा सुनावणी घेऊन पुरवणी आरोपपत्राची दखल घेतली. त्यानुसार, न्यायालयाने संशयित तन्ना याची आरोपातून सुटका केली आहे. 

हेही वाचा