जॉब वार्ता : गोवा समग्र शिक्षा अभियानामार्फत ८३ जागांसाठी भरती

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
19th September, 03:47 pm
जॉब वार्ता : गोवा समग्र शिक्षा अभियानामार्फत ८३ जागांसाठी भरती

पणजी :शिक्षण खात्याच्या समग्र शिक्षा अभियानामार्फत वेगवेगळ्या पदांच्या ८३ जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये ६० जागा एनएफक्यूएफचे विविध विषय शिकवण्यासाठी आहेत. ब्लॉक आणि क्लस्टर रिसोर्स पर्सन पदाच्या १९ जागा, एमआयएसच्या २ तर डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि मल्टीटास्क ( ड गट) या पदांच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. सर्व पदे एक वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. या पदांसाठी वॉक इन इंटरव्यू २५ ते ३० सप्टेंबर दरम्यान शिक्षण खात्याच्या पर्वरी कार्यालयात सकाळी ९.३० वाजता होतील.

एनएफक्यूएफचे विविध १२ विषय शिकवण्यासाठी ६० पैकी १३ जागा पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी या विषयाच्या आहेत. एपॅरलच्या ७,  आरोग्य सेवा विषयासाठी ६, कृषी, इलेक्ट्रॉनिक आणि ऑटो विषयाच्या प्रत्येकी ५, ब्युटी आणि वेलनेसच्या ४, कन्स्ट्रक्शन, प्लंबिंग , बँकिंग, लॉजिस्टिक आणि रिटेल या विषयासाठीच्या प्रत्येकी तीन जागा आहेत. सर्व पदांसाठी महिन्याला प्रत्येकी २० हजार रुपये वेतन असणार आहे. यासाठी २७ आणि ३० सप्टेंबर रोजी मुलाखती होतील. या पदांसाठी शाखेनुसार बीई, डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे.

ब्लॉक रिसोर्स पर्सनच्या १३ पदांसाठी २५ सप्टेंबर रोजी मुलाखत होणार आहे. या पदासाठी महिन्याला २५ हजार रुपये वेतन देण्यात येईल. उमेदवार बीएड किंवा एमएड पदवीधारक असावा तसेच २ ते ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. क्लस्टर  रिसोर्स पर्सनची ६ पदे आहेत. त्यासाठी २६ सप्टेंबर रोजी मुलाखत होणार आहे. महिन्याला २० हजार एवढे वेतन असलेल्या या पदासाठी डीएड किंवा बीएड पदवी असणे तसेच एका वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

उमेदवारांनी वॉक इन इंटरव्यूसाठी किमान अर्धा तास आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळी दहा वाजल्याच्या नंतर येणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी घेतले जाणार नाही. उमेदवारांनी रहिवासी दाखल्यासह अन्य आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी. अधिक माहितीसाठी www.scert.goa.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन समग्र शिक्षाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले आहे.

हेही वाचा