जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात ५८.१९ टक्के मतदान

किश्तवाडमध्ये सर्वाधिक ७७.२३ टक्के मतदान

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
20 hours ago
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात ५८.१९ टक्के मतदान

श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी सायं. ६ वाजता संपले. ७ जिल्ह्यांतील २४ विधानसभा जागांसाठी बुधवारी मतदान झाले. सायं. ५ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ५८.१९ टक्के होती.
संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, किश्तवाडमध्ये सर्वाधिक ७७.२३ टक्के आणि सर्वात कमी मतदान पुलवामामध्ये ४३.८७ टक्के इतके होते. बुधवारी २३.२७ लाख मतदार मतदान करणार होते. पक्ष प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी पीडीपी उमेदवार इल्तिजा मुफ्ती यांनी बिजबिहारा विधानसभा मतदारसंघातून मतदान केले. किश्तवाडमधील भाजप उमेदवार शगुन परिहार यांनीही मतदान केले. त्यांनी बागवान परिसरात ओळखपत्राशिवाय मतदान केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे काही काळ मतदान थांबले होते. विविध राज्यात राहणारे ३५ हजारांहून अधिक विस्थापित काश्मिरी पंडितांसाठीही दिल्लीत २४ विशेष बूथ बनवण्यात आले होते.
दरम्यान, गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. बुधवारी पहिल्या टप्प्यात एकूण ७ जिल्ह्यांमध्ये मतदान होत असून २४ जागांवर ९० अपक्षांसह एकूण २१९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील ही पहिली विधानसभा निवडणूक आहे.
९० जागांवर तीन टप्प्यांत मतदान
जम्मू-काश्मीरच्या ९० विधानसभा जागांवर बुधवारी (दि.‍‍१८) पहिल्या टप्प्यात निवडणूक झाली. यानंतर २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर असे तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. ८ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. २०१४च्या निवडणुकीत पीडीपीला सर्वाधिक २८ आणि भाजपला २५ जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्षांनी मिळून सरकार स्थापन केले होते.

हेही वाचा