लेबनॉनमध्ये पेजरनंतर आता वॉकीटॉकींचा स्फोट

९ ठार; ३०० हून अधिक लोक जखमी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
21 hours ago
लेबनॉनमध्ये पेजरनंतर आता वॉकीटॉकींचा स्फोट

बैरूत : लेबनॉनमध्ये मंगळवारी पेजर स्फोटानंतर, आता बुधवारी वॉकी-टॉकीमध्ये स्फोट झाले. घटनास्थळी असोसिएटेड प्रेस पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी तीन हिजबुल सदस्य आणि एका मुलाच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी हे स्फोट झाले. यावेळी आदल्या दिवशी पेजर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. वॉकी-टॉकीजमधील या स्फोटांमध्ये ९ लोकांचा मृत्यू झाला आहे तर ३०० हून अधिक जखमी झाले आहेत.
हिजबुलच्या अल मनार टीव्हीने लेबनॉनच्या अनेक भागात स्फोट झाल्याचे वृत्त दिले आहे. वॉकीटॉकीमधील स्फोटाच्या नव्या घटनांनंतर लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण आहे. हिजबुलच्या एका अधिकाऱ्याने, ज्याने ओळख पटवण्यास नकार दिला, त्याने प्रेसला सांगितले की, समूहाने वापरलेल्या वॉकी-टॉकीवर हा स्फोट झाला.
इस्रायलचा इशारा
गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमास या दहशतवादी संघटनेच्या सैनिकांनी हल्ला केला होता. तेव्हापासून हिजबुल्ला आणि इस्रायली सैन्यामध्ये जवळपास रोजच गोळीबार होत आहे. गोळीबार आणि हल्ल्यांमध्ये लेबनॉनमध्ये आतापर्यंत शेकडो लोक मारले गेले आहेत, तर इस्रायलमध्येही डझनभर लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सीमेच्या दोन्ही बाजूंनी हजारो लोकही विस्थापित झाले आहेत. इस्रायली नेत्यांनी अलिकडच्या आठवड्यात अनेक इशारे दिले आहेत की लेबनॉनमधील हिजबुल्लाह विरुद्धची मोहीम तीव्र होऊ शकते.
पेजर स्फोटात १२ जण मृत्युमुखी

लेबनॉनची राजधानी बेरूतसह सीरियामध्ये मंगळवारी अनेक ठिकाणी पेजरमध्ये स्फोट झाले होते. यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये हिजबुलचे ८ सदस्य आणि आठ वर्षांच्या एका मुलीचाही समावेश आहे. या हल्ल्यात ४००० हून अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी ४०० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. इराणचे राजदूतही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. पेजर स्फोटासाठी हिजबुलने इस्रायलला जबाबदार धरले असून बदला घेण्याची धमकी दिली आहे. 

हेही वाचा