चिखली- कोलवाळ येथे वीज टॉवरसाठी बेकायदा खोदकाम

वीज खात्याला निवेदन : टॉवर उभारण्यास जमीन मालकाचा विरोध

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th September, 11:19 pm
चिखली- कोलवाळ येथे वीज टॉवरसाठी बेकायदा खोदकाम

म्हापसा : चिखली-कोलवाळ येथील सर्व्हे क्र. १७०/३ मधील भात शेतीच्या जागेत अतिक्रमण करीत बेकायदेशीररित्या उच्च दाबाचा वीज टॉवर उभारण्याचे काम वीज खात्याने हाती घेतले आहे. याला जमीन मालक गुरूदास वळवईकर यांनी आक्षेप घेत टॉवरसाठी खोदण्यात आलेली जमीन पूर्वपदी आणण्याची मागणी वीज खात्याकडे केली आहे.

गुरूदास वळवईकर यांनी वीज खात्याचे कार्यकारी अभियंता (थिवी) यांना निवेदन सादर केले असून या निवेदनाच्या प्रत मुख्य वीज अभियंता, वीज मंत्री, स्थानिक आमदार, मुख्य सचिव व मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आल्या आहेत.

मालमत्तेत खड्डे खोदण्यासाठी आपल्याकडून सरकारने कोणताही पूर्वपरवानगी किंवा संमती घेतलेली नाही. बेकायदेशीररित्या खड्डे खोदण्याची वीज खात्याची ही कृती फौजदारी गुन्हा आहे. तसेच मालमत्तेचा नाश आणि जमिनीच्या मालकी हक्काचे उल्लंघन करणारा आणि सार्वजनिक अधिकाऱ्यांकडून आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करणारा हा प्रकार आहे. त्यामुळे खोदलेले खड्डे बुजवून जमीन मूळ स्थितीत आणावी व यापुढे माझ्या मालमत्तेमध्ये कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा हस्तक्षेप करू नये, अशी सूचना संबंधितांना द्यावी, जेणेकरून आमची मालमत्तेसंबंधी कोणताही गैरसोय किंवा आम्हाला त्रास होणार नाही, अशी मागणीही गुरूदास वळवईकर यांनी वीज खाते व सरकारकडे केली आहे.

मालमत्तेत प्रवेश करण्यास अडथळा

टॉवर उभारण्यात येत असलेली एकूण २७२५ चौरस मीटर भात लागवडीखालील जमीन आहे. या जमिनीच्या प्रवेशाद्वारावरच रस्त्याच्या बाजूने मोठे वीज टॉवर उभारण्यासाठी खड्डे खोदले गेले आहेत. या खड्ड्यांमुळे जमिनीची मशागत करण्यासाठी मालमत्तेत प्रवेश करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. 

हेही वाचा