ड्रग्स प्रकरण : न्यायालयाने पुराव्याच्या आधारे फेटाळला नायजेरियन नागरिकाचा जामीनअर्ज

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
15th September, 12:50 pm
ड्रग्स प्रकरण : न्यायालयाने पुराव्याच्या आधारे फेटाळला नायजेरियन नागरिकाचा जामीनअर्ज

पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एप्रिल २०२१ मध्ये कळंगुट येथे छापा टाकून मायकल ओकेरो या नायजेरीयन नागरिकाला अटक केली होती. या प्रकरणी संशयिताच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे निरीक्षण नोंदवून पणजी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश बॉस्को रॉर्बट्स यांनी संशयित ओकेरो याने दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळून लावला.

याप्रकरणी गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने २ एप्रिल २०२१ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, एएनसीचे तत्कालीन उपनिरीक्षक रोहन मडगावकर यांनी पथकाच्या मदतीने पोरबावाडो - कळंगुट येथील ग्रीन फिंगर नर्सरीजवळ २ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ५.४५ ते ८.५० दरम्यान सापळा रचला होता. त्यावेळी तिथे दुचाकी घेऊन आलेल्या संशयित मायकल ओकेरो या नायजेरीयन नागरिकांची पथकाने झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून २.८० लाख रुपये किमतीचे १४.४३ ग्रॅम अॅक्टसी पावडर आणि ९.५९ ग्रॅम हिरोईन जप्त करण्यात आला होता. त्यानंतर पथकाने त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. 

त्यानंतर एएनसीने तपास पूर्ण करून ३० सप्टेंबर २०२१ रोजी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी सादर केलेल्या पुराव्याची दखल घेऊन न्यायालयाने संशयित मायकल ओकेरो याच्या विरोधात नोव्हेंबर २०२१ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरु केला. याच दरम्यान संशयित ओकेरो याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयित ओकेरो यांनी व्यावसायिक पद्धतीचे ड्रग्ज तस्करी केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे न्यायालयासमोर सादर केले. या पुराव्यांची दखल घेऊन न्यायालयाने त्याच्या जामीन अर्ज फेटाळून लावला. 


हेही वाचा