नानोडा अपघातात ठार झालेल्या दोन्ही युवकांवर अंत्यसंस्कार

कारचालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th September, 12:18 am
नानोडा अपघातात ठार झालेल्या दोन्ही युवकांवर अंत्यसंस्कार

डिचोली : नानोडा - डिचोली येथे शनिवारी रात्री १० वा. पेठवाडा - नानोडा येथील व्हेली मिडोज जवळच्या वळणावर मारुती सियाझ आणि पल्सर दुचाकी यांच्यात समोरासमोर घडलेल्या अपघातात कानोळकरवाडा नानोडा येथील प्रतीक प्रवीण कानोळकर (२२) आणि वरचावाडा नानोडा येथील लक्ष्मण मळीक (२२) यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत रविवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अपघातात कारणीभूत ठरलेल्या मारुती कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

मारुती सीयाझ जी.ए. ०४ ई ११२४ ही गाडी दोडामार्गहून म्हापशाच्या दिशेने जात होती. तर, जीए ०४ पी ५१२६ ही पल्सर दुचाकी अस्नोडाहून नानोडाच्या दिशेने जात असताना दोघांमध्ये पेठवाडा नानोडा येथील व्हेली मीडोज जवळच्या वळणावर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की, मारुती गाडी घटनास्थळावरून फरफटत गेली. दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला होता.

यापूर्वीही या वळणावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले होते. या वळणावर समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज येत नसल्याने अपघात घडले आहेत. साधारण एक किलोमीटर परिसरात विजेची सोय नसल्यानेही अपघात घडत आहेत. काही वेळा मोकाट गुरे रात्रीच्यावेळी या भागात रस्त्यावर आडवी येत असल्यानेही अपघात घडले आहेत.

प्रतीक कानोळकर हा आपल्या पालकांचा एकुलता एक मुलगा होता. तो एका खासगी आस्थापनात कामाला होता तर, लक्ष्मण मळीक याला एक बहिण असून तो शिक्षण घेत होता.

या संपूर्ण घटनेचा तपास डिचोली पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक सागर एकोस्कर व पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विराज धावस्कर करीत आहेत.

हा भाग अपघात प्रवण क्षेत्र घोषित करावा

गुरे रात्रीच्या वेळी रस्त्यावर आडवी आल्याने काही वर्षांपूर्वी पत्रकार विशाल कळंगुटकर यांना प्राण गमवावे लागले होते. रस्त्याच्या एका बाजूला वाढलेल्या झुडपांची छाटणी न झाल्यानेही अपघात घडत आहेत. आतापर्यंतच्या अपघाताचा आकडा लक्षात घेता या भाग अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

हेही वाचा