राज्यात दिवसाकाठी ७ अपघात; ३१ तासांत सरासरी एकाचा मृत्यू

१ जानेवारी ते १४ सप्टेंबर २०२४ या कालावधीतील आकडेवारीतून स्पष्ट

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
15th September, 11:51 pm
राज्यात दिवसाकाठी ७ अपघात; ३१ तासांत सरासरी एकाचा मृत्यू

पणजी : राज्यात शनिवारी झालेल्या दोन भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अपघाती मृत्यूची दखल घेतली असता, राज्यात १८६ भीषण अपघातात १९७ मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात १ जानेवारी ते १४ सप्टेंबर २०२४ या २५८ दिवसांच्या कालावधीत सुमारे १,८२४ अपघातांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी पाहता दिवसाकाठी ७ अपघात, तर सरासरी ३१ तासांत एकाचा अपघाती मृत्यू होत आहे.

मांद्रे येथे शनिवारी नणंद व भावजय यांचा अपघातात मृत्यू झाला. तर, त्यांच्यासोबत असलेली तिसरी युवती गंभीर जखमी झाली. तर याच दिवशी नानोडा येथे पल्सर व कारमध्ये झालेल्या अपघातात दोघा युवकांचा मृत्यू झाला. अपघात रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी अपघातांचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही.

राज्यात १ जानेवारी ते १४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सुमारे १,८२४ अपघात झाले आहेत. यात १८६ भीषण अपघातांची नोंद आहे. वरील कालावधीत एकूण १९७ जणांचा अपघातांत मृत्यू झाला आहे. याशिवाय १४३ अपघातांत १८७ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. राज्यभर झालेल्या ३६९ किरकोळ अपघातांत ५६६ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. शिवाय १,४९५ अपघातांत वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात वाहतूक खाते तसेच गोवा पोलिसांचा वाहतूक विभाग आणि स्थानिक पोलीस अपघात आणि अपघाती मृत्यू टाळण्यासाठी विविध उपक्रम हाती घेत आहेत. त्यात वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्यांवर विशेष मोहीम सुरू करून कारवाई केली जाते. त्यात प्रामुख्याने मद्यपी चालक, अतिवेगाने वाहन हाकणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, सीट बेल्ट न घालणे, वाहनांना काळ्या रंगाच्या काचा लावणे अशा प्रकारांचा वाहतूक नियम उल्लंघनाचा समावेश आहे.

नियमांबाबत जागृती, तरीही अपघात

राज्यात पोलिसांकडून नागरिक तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती केली जात आहेत. मात्र, खराब रस्ते व रस्त्याचे चुकीच्या पद्धतीने बांधकाम, वाहनचालकांची बेफिकिरी आणि निष्काळजी, वाहतूक नियमांचे उल्लंघन अशा अनेक कारणांमुळे अजूनही अपघात घडत आहेत. 

हेही वाचा