घाटेश्वरनगरमधील २२ बेकायदा दुकानांना टाळे

म्हापसा पालिकेची कारवाई : आठ दुकाने जमीनदोस्त करण्याचाही आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
घाटेश्वरनगरमधील २२ बेकायदा दुकानांना टाळे

म्हापसा : घाटेश्वरनगर खोर्ली येथील डीएमसी कॉलेजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररित्या बांधलेल्या एकूण २२ गाळेवजा दुकानांना म्हापसा पालिकेने नोटीस बजावत ही दुकाने बंद केली. तर, त्यातील आठ दुकाने जमीनदोस्त करण्याचा आदेशही पालिकेने दिला आहे.

खोर्ली ते आसगाव दरम्यान रस्त्याच्या कडेला घाटेश्वरनगर येथे खोर्ली कोमुनिदादच्या जागेत पालिकेचा परवाना न घेता अवैधरित्या गाळेवजा पक्की दुकाने बांधण्यात आली होती. त्यात बेकायदा व्यवसाय थाटण्यात आल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार पालिका मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी ही दुकाने बांधलेल्या रंझान अली शेख, तबसूम बेपारी, फिरीद खान, हमन अली, संतोष गावडे, रतिश किनळकर, सिद्धेश अंम्रे, अब्दुल्ला खान, स्वप्नील आराबेकर, मनीषा मेथर, दादा च्यारी, मार्कुस मार्टीन्स, वेन्सी मार्टीन्स, विक्टर जेम्स मार्टीन्स यांच्यासह इतर अज्ञात मिळून एकूण २२ जणांची ही दुकाने बंद करण्याचे निर्देश पालिका अभियंता व निरीक्षकांना दिले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी नगरपालिकेच्या पथकाने ही सर्व दुकाने टाळेबंद केली.

या २२ पैकी आठ दुकाने पालिका अधिकऱ्यांनी सुनावणीअंती पाडण्याचा आदेश दिला आहे. तर, इतर दुकानांची सुनावणी सुरू आहे. सुनावणीनंतर ती देखील पाडण्याचा आदेश जारी केला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

म्हापशातील अन्य बेकायदा दुकानांवर कारवाईची मागणी

म्हापसा पालिका क्षेत्रात मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावर मिळून हजारपेक्षा जास्त बेकायदेशीररित्या गाळेवजा दुकाने बांधून त्यात अवैधपणे व्यवसाय सुरू आहे. ही दुकाने रस्ता रूंदीकरण, तसेच वाहन वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. अलंकार थिएटर परिसरातील काही इमारतींमध्येही अवैधपणे फास्टफुडचा व्यवसाय थाटण्यात आला आहे. पालिकेकडून या दुकानांवर देखील कारवाई अपेक्षित आहे. 

हेही वाचा