दांडेली: बर्ची वनक्षेत्रात सापडलेल्या वाघाच्या मृतदेहाचे गूढ दोन वर्षानी उलगडले; दोघांना अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th September, 03:30 pm
दांडेली: बर्ची वनक्षेत्रात सापडलेल्या वाघाच्या मृतदेहाचे गूढ दोन वर्षानी उलगडले; दोघांना अटक

जोयडा :दांडेली तालुक्यातील बर्ची वनक्षेत्रात दोन वर्षांपूर्वी हात पाय कापलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी आता वनखात्याने बेळगाव येथील दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी बेळगावच्या अत्तीवाड येथील सोमनाथ पाटील यास जगलबेट वन अधिकाऱ्यांनी  अटक करून न्यायाल्यात हजर केले. तर बेळगाव येथीलच तानाजी गल्लीत राहणाऱ्या इंद्रजीत गसरी या दुसऱ्या संशयितास ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. 

दांडेली तालुक्यातील बर्ची वनक्षेत्रातील नानाकिशोर्डा गावाजवळ १८ डिसेंबर २०२२  रोजी शिर  व चारही पाय कापलेल्या अवस्थेत नर वाघाचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे अज्ञात शिकारी किंवा तस्कराने त्यांचे पाय व शिर कापून नेले असावेत, असा संशय वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. या प्रकरणी वन अधिकाऱ्यांनी  विविध प्रकारे तपास केला आहे. सीसीटीव्ही कॅमेरा,  घटना स्थळाच्या ठिकाणी झालेली मोबाईल ऍक्टिव्हिटी  याच्या आधारावर तपास करून वन अधिकाऱ्यांनी दोघांना अटक केली आहे.

असे प्रकाश झोतात आले होते प्रकरण 

दोन वर्षांपूर्वी दांडेली तालुक्यातील बर्ची वनक्षेत्रात हात पाय कापलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह सापडला तर, जोयडा तालुक्यातील जगलबेट येथे पाशात अडकून मृत्यू झालेल्या बिबट्या आढळून आल्याने खळबळ माजली होती. या दोन्ही घटना घडल्या त्या दोन्ही जागेतील अंतर अंदाजे १५ कि. मी. होते.  दरम्यान, वाघाच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि वन्यजीव अधिनियमाच्या निर्देशनुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरील घटनेच्या ठिकाणाहून सुमारे १५ ते २० कि. मी. अंतरावर जगलबेट येथे बर्ची, दांडेली बायपास रस्त्यालगत बिबट्याचाही मृतदेह आढळून आला होता. त्याची शवचिकित्सा केली असता, गळ्याला फास लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे शिकारीसाठी लावलेल्या फासात बिबट्या अडकल्याने त्याचा मृत्यू झाला असावा व पुरावे नष्ट करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला जंगलात त्याला आणून टाकले असावे, असा संशय वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रगत तंत्रज्ञान,वनविभाग, ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरूच होता. दोन वर्षांनंतर हे प्रकरण सोडवण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. 

हेही वाचा