भेसळयुक्त बडीशेपची ही खेप पुण्याहून गोव्यात आणल्याची माहिती.
म्हापसा : गेल्या वर्षभरापासून एफडीएने परराज्यातून गोव्यात येणाऱ्या भेसळ युक्त खाद्यपदार्थांवर करडी नजर ठेवली असून, वेळोवेळी यावर कडक कारवाई केली आहे. आता पुन्हा एफडीएने कारवाईचा बडगा उगारला असून म्हापसा येथील नव्या बस स्थानकावर छापेमारी करत तब्बल २०० किलो भेसळयुक्त बडीशेप जप्त केली आहे. या बडीशेपची किंमत ७४ हजार रूपये आहे. ही खेप पुण्याहून गोव्यात आणल्याची माहिती समोर आली असून, यापूर्वी पुणे आणि तत्सम ठिकाणहून बनावट पनीर व इतर खाद्यपदार्थ गोव्यात आले होते.
शुक्रवारी सकाळी अन्न व औषधे प्रशासनाकडून हा छापा टाकण्यात आला यावेळी २०० किलोची भेसळयुक्त बडीशेप सापडली. ही भेसळयुक्त बडीशेप राज्यात विविध ठिकाणी असलेल्या हॉटेल, दुकाने व होलसेल तसेच घाऊक विक्री दुकांनात विक्रीसाठी पाठवण्यात येणार होते. यासोबतच इतर काही खाद्यपदार्थही एफडीएने जप्त केले. यात ब्रेडचा समावेश होता. या ब्रेडच्या पाकिटावर उत्पादनाची तारीख नव्हती. रेस्टॉरंटमध्ये या ब्रेडचा पुरवठा केला जाणार होता. शिवाय काही प्रमाणात मटण देखील जप्त केले.
जप्त केलेल्या बडीशेपचे नमुने घेतले असून बडीशेपला प्रक्रिया केलेला रंग चढविण्यात आला होता. याप्रकरणी संबंधित विक्रेत्यावर अन्न व औषधे प्रशासनाकडून गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे एफडीएचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांनी सांगितले. अन्न व औषधे प्रशासनाचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, राजाराम पाटील, शैलेश शेणवी, अमित मांद्रेकर, लेनिन डिसा व साईनाथ मांद्रेकर या पथकाने ही कारवाई केली.दरम्यान, अन्न व औषधे प्रशासनाकडून बाहेरील राज्यातून आलेल्या मालाचा दर्जा तपासण्याची मोहीम राबवली असून या मालिकेतील ही नववी कारवाई आहे. स्वच्छ तसेच दर्जात्मक खाद्यपदार्थांच्या वस्तूंचा पुरवठा राज्यात व्हावा या अनुषंगाने जनजागृतीसाठी प्रशासनाकडून ही मोहिम राबवण्यात आली आहे.
अनेकदा घडलेत असे प्रकार
गेल्या जुलै महिन्यात आंतरराज्यीय प्रवासी बसमधून होणारी भेसळयुक्त खाद्यपदार्थांची वाहतूक रोखण्याच्या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन विभागाने म्हापसा आंतरराज्य बस स्थानकावर पुन्हा छापा टाकला होता. महाराष्ट्रातून बस वाहतुकीमार्गे लेबल नसलेले १५० किलो पनीर व दही या पदार्थांसह ५० किलो तळलेला कांदा (फ्राईड ओनियन) असा दीड लाखांचा माल यावेळी जप्त करण्यात . ठाणे मुंबईहून भेसळयुक्त पनीर पदार्थाची गोव्यात वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास अन्न व औषधे प्रशासनाच्या अधिकार्यांनी हा छापा टाकला होता.
परराज्यातून आलेल्या सर्व अन्न पदार्थांच्या पार्सलची गुणवत्ता अधिकार्यांनी तपासली असता यात ५०० किलो पनीर व १५० किलो दही आणि ५० किलो तळलेला कांदा सापडला. पनीर म्हापशातील तर कांदा कळंगुटमधील व्यापार्याला पाठवण्यात येणार होता. अन्न सुरक्षा आणि पॅकेजिंग निकषांनुसार हे पदार्थ योग्य प्रकारे वाहून आणले नसल्याचे पाहणीत आढळून आले. पडताळणीनंतर हे पदार्थ जप्त करण्यात आले व म्हापसा पालिकेच्या सहाय्याने या सर्व पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली होती. दरम्यान, या पथकाने म्हापसा शहरात खाद्य पदार्थ विकणार्या विक्रेत्यांकडून रंगीत कापूस, कँडी जप्त केली व त्याचेही नमुने घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे .