वास्कोत निकृष्ट दर्जाची, कुजलेली फळे ग्राहकांच्या माथी

अन्न व औषध प्रशासनाने दखल घेण्याची गरज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th November, 12:08 am
वास्कोत निकृष्ट दर्जाची, कुजलेली फळे ग्राहकांच्या माथी

आतून काळी पडलेली व कीड लागलेली सीताफळे. (अक्षंदा राणे)

वास्को : येथे निकृष्ट दर्जाची सफरचंद, सीताफळे, पपई तसेच इतर काही फळे ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे. सदर फळे ग्राहकांना घाऊक विक्रेत्यांतर्फे विकण्यात येतात. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नसल्याचे किरकोळ विक्रेते सांगतात. तथापी नफा कमावण्याच्या आशेने सदर फळे ग्राहकांच्या माथी मारली जात असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
याप्रकरणी ग्राहक तक्रार करीत नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाला माहिती मिळत नाही हे जरी खरे असले तरी, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी वर्गाने नियमितपणे व अचानकपणे तपासणी केल्यास सदर फळे विकण्यास विक्रेते धजावणार नाही.
सफरचंद, सीताफळे वगैरे आतून काळी झालेली आढळतात. सीताफळे तर बाहेरून पिकलेली वाटतात. परंतु, ती फोडल्यास आतून घट्ट असलेली नजरेस पडतात. त्यामुळे सदर सीताफळे कृत्रिमरीत्या पिकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा काही ग्राहक करतात. सीताफळ फोडल्यास ते आतून कुजलेले तसेच त्यामध्ये किडे वळवळत असल्याचे दिसून येतात. त्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. सदर खराब फळांबद्दल विक्रेत्यांना सांगूनही काहीच फायदा होत नाही. पपयांच्या बाबतीतही काही वेळा ग्राहकांना नुकसान सहन करावे लागते. वरून चांगली पिकलेली दिसणारी पपई मात्र आतून घट्ट व बेचव असते. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सध्या गोव्यात ठिकठिकाणी छापे मारत आहेत. निकृष्ट दर्जाच्या काजूबिया, खराब खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दणका देत आहेत. त्या अधिकारी वर्गाने फळ विक्रेत्यांनाही दणका देण्याची गरज आहे.                    

हेही वाचा